ब्रिस्बेन : महिला बिग बॅश लीगमध्ये (WBBL)भारतीय महिला संघाची स्टार ऑलराउंडर खेळाडू पूजा वस्त्रकार (Pooja Vastrakar)खेळणार आहे. लीगमधील ब्रिस्बेन हिटच्या फ्रँचायझीने तिचा समावेश आपल्या संघात केल्याची घोषणा गुरूवारी केली आहे. महिला बिग बॅश लीग (Women Big Bash League) ८ च्या आधी न्यूझीलंडची ऑलराउंडर खेळाडू अमेलिया केर नंतर हिटमध्ये सामील होणारी वस्त्रकार ही दुसरी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.
फ्रँचायझीने जारी केलेल्या एका निवदेनात म्हटले की, "भारताची २२ वर्षीय ऑलराउंडर खेळाडू मागील ऑस्ट्रेलियाचा दौरा आणि आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळी आमच्या नजरेत आली होती. तेव्हा संघाचे प्रशिक्षक ॲशले नॉफके तिच्या शानदार खेळीमुळे खूप प्रभावित झाले होते." वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिध्द असलेली वस्त्रकार आक्रमक फलंदाजीसाठी देखील माहिर आहे.
स्मृती आणि पूनम यांच्या क्लबमध्ये समावेश दरम्यान, स्मृती मानधना आणि पूनम यादव नंतर ब्रिस्बेन हिटसाठी खेळणारी वस्त्रकार ही तिसरी भारतीय खेळाडू ठरणार आहे. तिने आतापर्यंत २३ एकदिवसीय, २७ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि २ कसोटी सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे नुकतीच ती कोरोनातून बरी झाली आहे, ज्यानंतर बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ती भारतीय संघाचा हिस्सा आहे. राष्ट्रकुल स्पर्धांच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. जिथे भारतासहित अन्य १२ संघ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी आमनेसामने असणार आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, तानिया भाटिया, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम यादव, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा, सिमरन बहादूर.