अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर -
आयपीएल २०२२ च्या लिलवात पहिल्या दिवशी इशान किशनला भल्यामोठ्या किंमतीमध्ये खरेदी करून तो खेळाडू आपल्यालाच पाहिजे होता हे मुंबई इंडियन्सने दाखवून दिले. विशेष म्हणजे क्विंटन डीकॉकसाठी त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली नसल्याचे पाहून धक्का बसला. त्यामुळे किशनसाठी मोजलेली किंमत पाहता त्याला मुंबईने आधीच रिटेन का केले नाही, असाही प्रश्न पडतो.
श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांना समान रकमेमध्ये आरसीबीने आपल्या ताफ्यात पुन्हा समाविष्ट करून घेतले. काही संघांनी ४, तर काहींनी २ किंवा ३ खेळाडू रिटेन केले होते. त्यामुळे पहिल्या दिवशीचा लिलाव प्रक्रिया पाहता असे दिसून आले की, प्रत्येक संघ आपला अंतिम संघ तयार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. जे खेळाडू मैदानात उतरणार त्यांच्यावर जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा दिसला.
काही अनुभवी खेळाडूंना पुन्हा एकदा दिलासा मिळाला. शिखर धवन, अंबाती रायूडू, रविचंद्रन अश्विन या अनुभवी खेळाडूंना किंमत मिळाली. पण, सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन अशा स्टार खेळाडूंना कोणीही खरेदी केले नाही. त्यांना रविवारी पुन्हा संधी मिळेल. पण यावरुन प्रत्येक संघाची एक मानसिकता दिसली. प्रत्येक संघाने असे खेळाडू निवडले, ज्यांचा मैदानावर प्रभाव दिसून येईल. यामुळेच मॅचविनिंग अष्टपैलू खेळाडूंसाठी मोठी चढाओढ रंगल्याचे पाहण्यास मिळाले. तसेच, काही खेळाडू स्वस्तामध्ये विकले गेले, जसे की, गेल्या सत्रातील महागडा खेळाडू पॅट कमिन्स कोलकाताला यावेळी अर्धा किंमतीमध्ये मिळाला. शिवाय अनकॅप्ड खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे रविवारी १९ वर्षांखालील खेळाडू कशाप्रकारे किंमत मिळवतात हेही पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Web Title: Indian and all-rounder Players shine in IPL Auction 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.