भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) २०२० पासून भारताच्या कसोटी संघाच्या बाहेर आहे.. वन डे व ट्वेंटी-२० संघात त्याला संधी मिळाली परंतु त्याला त्यातही काही खास करता आले नाही. क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा तो मैदानाबाहेरील वादामुळेच चर्चेत राहिला आहे. पण, आता हे सर्व निराशा मागे टाकून पृथ्वी पुन्हा भारतीय संघात परतण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पृथ्वी दुलिप ट्रॉफीनंतर कौंटी क्रिकेटमधील Northamptonshire क्लबकडून खेळणार आहे. पृथ्वी प्रथमच कौंटी क्रिकेट खेळायला जाणार आहे.
पृथ्वीने जेव्हा भारतीय संघात पदार्पण केले, तेव्हा त्याची तुलना सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग व ब्रायन लारा यांच्याशी झाली. पण, काही कालावधीनंतर पृथ्वी भरकटलेला पाहायला मिळाला, त्यात फिटनेसच्या कारणामुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले. २०२० पासून तो कसोटी संघाच्या बाहेर आहे, २०२१ मध्ये तो भारताकडून शेवटची वन डे व ट्वेंटी-२० मॅच खेळला. आयपीएलमध्येही त्याला काही खास करता आले नाही. त्यामुळे त्याचे भारतीय संघातील परतीचे दरवाजे बंद झाले. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने काही अविश्वसनीय कामगिरी केल्या, परंतु त्यात सातत्य नव्हते. पृथ्वीने भारताकडून ५ कसोटीत ३३९ धावा, ६ वन डे सामन्यांत १८९ धावा आणि १ ट्वेंटी-२०त शून्य धावा केल्या आहेत.
पृथ्वी शॉला वाटतं तो 'स्टार' आहे, त्याच्यासारखं कुणी नाही!
भारताचे माजी क्रिकेटपटू कर्सन घावरी ( Former Indian cricketer Karsan Ghavri) यांनी पृथ्वी शॉवर जोरदार टीका केली आहे. “२०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघात ही दोघही होती, बरोबर? आज कुठे पृथ्वी शॉ आणि कुठे शुभमन गिल? ते दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आहेत,” असे घावरी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. “शॉला वाटते की तो एक स्टार आहे आणि त्याला कोणीही हात लावू शकत नाही. त्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर, आपण ट्वेंटी-२०, ५० षटकं किंवा कसोटी सामना किंवा अगदी रणजी ट्रॉफी खेळत असलात तरीही, आपल्याला बाहेर काढण्यासाठी फक्त एक चेंडू लागतो. तुम्हाला शिस्त आणि चांगला स्वभाव हवा आहे. आपल्याला सतत मेहनत करणे आवश्यक आहे. तुम्हाला क्रीजवर कब्जा करणे आवश्यक आहे आणि जर तुम्ही तसे केले तर तुम्हाला अधिक धावा मिळतील.”
Web Title: Indian batsman Prithvi Shaw to play for Northamptonshire in County cricket after Duleep Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.