भारतीय संघ पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार असून तिथे ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. १० डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या दिवशी ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला जाईल. तीन ट्वेंटी-२०, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने टीम इंडिया आफ्रिकेच्या धरतीवर खेळणार आहे. वन डे विश्वचषक संपल्यानंतर भारत मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे, यासाठी संघ जाहीर झाला असून सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अद्याप बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली नाही. पण, 'टाइम्स ऑफ इंडिया'ने सूत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या माहितीनुसार, भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला आगामी दौऱ्यातून वगळले जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून रहाणेने जोरदार पुनरागमन केले होते. त्यापूर्वी रहाणेने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती.
रहाणेला वगळले जाणार?"भारतीय निवड समिती दूददृष्टीचा विचार करून निर्णय घेत आहे. जे खेळाडू मोठ्या कालावधीसाठी एकत्र खेळू शकतात त्यांना अधिक प्राधान्य दिले जाईल. श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरला असून शुबमन गिल कसोटीमध्ये नंबर ३ वर खेळतो. त्यामुळे रहाणेला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण लोकेश राहुल देखील आगामी दौऱ्यावर यष्टीरक्षक फलंदाज म्हणून महत्त्वाचा आहे", अशी माहिती सूत्रांनी दिली. भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० मालिका
- पहिला सामना - १० डिसेंबर, डर्बन
- दुसरा सामना - १२ डिसेंबर, कॅबेर्हा
- तिसरा सामना - १४ डिसेंबर, जोहान्सबर्ग
वन डे मालिका
- पहिला सामना - १७ डिसेंबर, जोहान्सबर्ग
- दुसरा सामना - १९ डिसेंबर, कॅबेर्हा
- तिसरा सामना - २१ डिसेंबर, पार्ल
कसोटी मालिका
- पहिला सामना - २६ ते ३० डिसेंबर, सेन्च्युरियन
- दुसरा सामना - ३ ते ७ जानेवारी २०२४, केप