इंडियन प्रीमअर लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने सर्व १४ साखळी सामने खेळले. १४ सामन्यांत ७ विजय व ७ पराभव पत्करून १४ गुणांसह DC अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. पण, त्यासाठी त्यांना आता पूर्णपणे अन्य संघांच्या कामगिरीवर अलवंबून रहावे लागणार आहे. तुर्तास तरी त्यांचे प्ले ऑफ खेळण्याच्या आशा फार कमीच आहेत आणि आता संघ आयपीएल २०२५ च्या तयारीला लागला आहे. त्यामुळे काही संघातील काही खेळाडूंना बाहेर काढले जाऊ शकते...
आयपीएल २०२५ पूर्वी पुन्हा एकदा मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्यासाठी फ्रँचायझी मोजक्याच खेळाडूंना कायम राखण राहेत. कायम राखल्या जाणाऱ्या खेळाडूंची संख्या ही एकेरी असेल एवढी नक्की. भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला काल लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात संधी दिली गेली नाही. यंदाच्या पर्वात त्याला केवळ ८ सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात त्याने १९८ धावा केल्या. पृथ्वीचा एकंदर खेळ पाहता DC पुढील पर्वासाठी त्याला संघात कायम राखण्याची शक्यता कमीच आहे.
पृथ्वीच्या जागी संधी मिळालेल्या अभिषेक पोरेलने आपले नाणे खणखणीत वाजवले आणि १४ सामन्यांत ३२७ धावा केल्या. त्यामुळे संघ पृथ्वीपेक्षा अभिषेकवर जास्त विश्वास दाखवत आहेत. पृथ्वीच्या अनुपस्थितीबाबत प्रविण आम्रे यांना विचारले असता ते म्हणाले, पृथ्वी शॉ हा रिटेन खेळाडू आहे आणि तुम्ही पाहिलेच असेल की मागील ४-५ सामन्यांत तो बाकावरच बसून आहे, परंतु हेच आयपीएल आहे. जर तुम्ही फॉर्मात नसाल, तर तुम्हाला संघात स्थान मिळणे अवघड आहे. शेवटी संघावरही दडपण असते आणि प्रत्येक सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो व तो त्यांना जिंकयाचा असतो.
दिल्ली कॅपिटल्सला यंदाच्या पर्वात बरेच युवा प्रतिभावान खेळाडू सापडले आहेत. जॅक फ्रेझर मॅकगर्क व त्रिस्तान स्तब्स यांनी प्रभाव पाडला आहे, तर अभिषेक व रसिख सलाम यांनी त्यांच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बीसीसीआयने अद्याप फ्रँचायझी किती खेळाडूंना रिटेन करू शकते, हे जाहीर केलेले नाही, परंतु तो आकडा १० पेक्षा कमीच असेल हे नक्की.