आजपासून बहुचर्चित वन डे विश्वचषकाला सुरूवात होत आहे. भारतात होत असलेल्या या स्पर्धेचा प्रबळ दावेदार म्हणून यजमान संघाकडे पाहिले जात आहे. टीम इंडिया ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातून आपल्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरूवात करेल. आज सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात आहे. क्रिकेट विश्वातील जाणकार, माजी खेळाडू आणि चाहते आपापल्या संघाला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहेत. भारताचा स्टार खेळाडू शिखर धवनने देखील टीम इंडियाला विश्वचषकाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. 'विश्वचषकाची ट्रॉफी घरी आणा', असे यावेळी 'गब्बर' धवनने म्हटले.
शिखर धवनने भारतीय संघाला शुभेच्छा देताना म्हटले, "चक दे इंडिया. चला जगाला निळ्या रंगात रंगवूया, टीम इंडियाला विश्वचषकाच्या प्रवासासाठी शुभेच्छा. ती ट्रॉफी घरी आणा."
स्पर्धेच्या तोंडावर बुधवारी 'कॅप्टन्स डे'च्या माध्यमातून प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी आपापली मतं मांडली. आम्ही या स्पर्धेत आमचा सर्वोत्तम खेळ करू आणि वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, असे विधान रोहितने यावेळी केले. तो पुढे म्हणाला, ''मागील तीन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये यजमान संघ जिंकला आहे, पण या गोष्टीचा मी जास्त विचार करत नाही. आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू आणि या स्पर्धेचा मनापासून आनंद लुटू. आम्ही आमच्या रणनीतीची कशी अंमलबजावणी होईल हे पाहू आणि आमच्या कौशल्याचा पूर्ण वापर करून वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करू.''
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
वनडे विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू