नवी दिल्ली : आयसीसी क्रमवारीत भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद सिराजचा बोलबाला पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या वन डे मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर मोहम्मद सिराजलाआयसीसीने मोठे गिफ्ट दिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वन डे क्रमवारीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. लक्षणीय बाब म्हणजे सिराजसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
मोहम्मद सिराज अव्वल स्थानी विराजमान 28 वर्षीय मोहम्मद सिराज गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचला आहे. त्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला मागे टाकले आहे. सिराज 729 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे, तर हेझलवूड 727 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
मोहम्मद सिराजचा बोलबालामोहम्मद सिराजने 15 जानेवारी 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड येथील सामन्यात वन डे पदार्पण केले होते. या सामन्यात सिराजला एकही बळी मिळाला नव्हता. तसेच पुढील तीन वर्षे एकही वन डे सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सिराजने 6 फेब्रुवारी 2022 रोजी तीन वर्षांनंतर कारकिर्दीतील दुसरा वन डे सामना खेळला होता.
यानंतर सिराजने चमकदार खेळी केली आणि भल्या भल्यांना मागे टाकले. सिराजने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 21 वन डे सामने खेळले असून त्यात त्याने 20.73 च्या सरासरीने 38 बळी घेतले आहेत. अलीकडेच सिराजने न्यूझीलंडविरुद्ध तीनपैकी दोन वन डे सामने खेळले, ज्यात त्याने 5 बळी घेतले. याआधी श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांमध्ये सिराजने 9 बळी पटकावले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"