भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची मैत्रिण दिव्या सिंहसोबत याच वर्षी फेब्रुवारीत साखरपुडा केला होता. बुधवारी भारतीय खेळाडूने आपल्या नव्या खेळीला सुरूवात केली. मुकेशची पत्नी दिव्या ही बिहारमधील छपरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुकेश कुमारने त्याच्या सोशल मीडियावर दिव्यासोबतच्या रिंग सेरेमनीचे फोटो शेअर केले होते.
मुकेश कुमार अडकला विवाहबंधनातमुकेश कुमार आणि दिव्या एकमेकांना आधीच ओळखतात. दिव्या सिंह एका सामान्य कुटुंबातून येते. दिव्या आणि मुकेश यांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित लोक लग्नाला नवीन जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आले. स्थानिक माध्यमांनी मुकेशच्या लग्नाची झलक सोशल मीडियावर शेअर केली. मुकेश कुमारच्या आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सनेही लग्नाचे फोटो पोस्ट करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून यजमानांनी २-० अशी आघाडी घेतली होती. पण तिसरा सामना जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले. खरं तर मुकेश कुमारने लग्नाच्या कारणास्तव तिसऱ्या सामन्यातून माघार घेतली होती, ज्याची माहिती बीसीसीआयने दिली. मात्र १ डिसेंबरला रायपूर येथे होणाऱ्या सामन्यासाठी तो टीम इंडियासोबत असेल.
दरम्यान, बिहारचा रहिवासी असलेल्या मुकेश कुमारने बंगालमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने बंगाल क्रिकेटमधून अंडर-१९ क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, दीर्घकाळ रणजी ट्रॉफीमध्ये खेळल्यानंतर त्याला २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने ३६ धावांत पाच बळी घेतले होते.