Join us  

वर्ल्ड कप २०२३ कोण जिंकणार? आर अश्विनने टीम इंडियासोडून दुसऱ्याच संघाचं सांगितले नाव

भारतीय संघ नेहमीप्रमाणे जेतेपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदारांपैकी एक आहे, त्यात हा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने रोहित शर्मा अँड कंपनीच बाजी मारेल, असा अनेकांना विश्वास आहे. पण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 3:39 PM

Open in App

आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ चे यजमानपद भारत भूषविणार आहे. ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत देशातील १० विविध शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. यजमान भारताचा पहिला सामना पाचवेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी ८ ऑक्टोबरला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.  पण, सर्वांना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान यांच्यातल्या हाय व्होल्टेज सामन्याची. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला IND vs PAK लढत होणार आहे, परंतु नवरात्रीमुळे हा सामना १४ ऑक्टोबरला खेळवला जाईल असे वृत्त आहे.

भारतीय संघ नेहमीप्रमाणे जेतेपदाच्या शर्यतीतील प्रबळ दावेदारांपैकी एक आहे, त्यात हा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने रोहित शर्मा अँड कंपनीच बाजी मारेल, असा अनेकांना विश्वास आहे. पण,भारताचा अनुभवी फिरकीपटू आणि कसोटी क्रिकेटमधील नंबर वन गोलंदाज आर अश्विन ( R Ashwin) याने दुसराच संघाचं नाव प्रबळ दावेदार म्हणून सांगितलं आहे.

२०११साली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वन डे वर्ल्ड कप जिंकला होता आणि अश्विन त्या संघाचा सदस्य होता. ३६ वर्षीय अश्विनच्या नावावर कसोटीत ४८९, वन डेत १५१ आणि ट्वेंटी-२०त ७२ विकेट्स आहेत. त्याच्या मते पाच वेळा वर्ल्ड कप जिंकणारा ऑस्ट्रेलिया यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. तो म्हणाला, अनेक खेळाडूंनी व तज्ज्ञांनी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला दावेदार म्हणून जाहीर केलं आहे, परंतु असं करून ते भारतीय संघावर दडपण आणू पाहत आहेत आणि स्वतःवरील दडपण कमी करू पाहत आहेत.

'' ऑस्ट्रेलिया हा यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. जगभरातील लोकं भारत वर्ल्ड कप जिंकेल असे सांगत आहेत, याची मला कल्पना आहे. पण, जगभरातील सर्व क्रिकेटपटूंची ही एक रणनीती आहे आणि आयसीसीच्या प्रत्येक स्पर्धांपूर्वी ते असा दावा करून भारतीय संघावर दडपण वाढवतात. ही रणनीती वापरून ते स्वतःच्या संघावरील दडपण कमी करतात, परंतु भारतावर अतिरिक्त दबाव निर्माण करतात. भारतीय संघही प्रबळ दावेदारांपैकी एक असू शकतो, परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ तगडा आहे,''असे अश्विनने त्याच्या यू ट्यूब चॅनेलवर म्हटले.

तो पुढे म्हणाला, माझ्या मते जागतिक क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. तेव्हा वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज पॉवर हाऊस होता. १९८३मध्ये आम्ही वर्ल्ड कप जिंकला, १९८७ मध्ये आम्ही जवळ पोहोचलो होतो, परंतु १९८७नंतर ऑस्ट्रेलियाचाच दबदबा राहिला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सातत्याने त्यांचे नाणे खणखणीत वाजले आहे.''

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया हा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी १९८७मध्ये अॅलन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला. १२ वर्षानंतर स्टीव्ह वॉ याच्या नेतृत्वाखाली १९९९चा वर्ल्ड कप जिंकला. रिकी पाँटिंगने २००३ व २००७ असे दोन वर्ल्ड कप जिंकले आणि २०१५मध्ये मायकेल क्लार्कच्या नेतृत्वाखाली पाचवा वर्ल्ड कप उंचावला. 

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआर अश्विनरोहित शर्माआॅस्ट्रेलिया
Open in App