Join us  

एअरफोर्सचा जवान ते टीम इंडियाचा खेळाडू, अशी आहे सौरभ कुमारची वाटचाल

वयाच्या २१व्या वर्षी सौरभला क्रिकेट निवडावे की आपले भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावित हा पेच त्याच्या आयुष्यात निर्माण झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 7:35 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेल्या सौरभ कुमारला सात वर्षांआधी कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. वयाच्या २१व्या वर्षी सौरभला क्रिकेट निवडावे की आपले भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावित हा पेच निर्माण झाला होता. क्रीडापटूंसाठी असलेल्या कोट्यातून भारतीय वायुसेनेत नोकरीवर लागलेल्या सौरभ कुमारला एक चांगली सरकारी नोकरी लागली होती. मात्र क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची खुमखुमी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. 

याबाबत बोलताना सौरभ कुमार म्हणाला, आयुष्यात एक वेळ अशी येते की, तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा लागतो. दोनपैकी एक मार्ग निवडावा लागतो. त्यावेळी मी सेना सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. कारण सेनेच्या संघाकडून क्रिकेट खेळणे माझ्यासाठी आनंददायी होते. मात्र त्याच वेळी भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्नही खुणावत होते. त्यामुळे मी सेनेची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्या कुटुंबाने मात्र मला प्रत्येक निर्णयात साथ दिली. कारण जेव्हा मी वायुसेनेची नोकरी सोडण्याचा निर्णय घरच्यांना सांगितला तेव्हा त्यांनी मला एका शब्दानेही उलट प्रश्न केला नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला आशीर्वाद दिला. 

सौरभ कुमार द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षक सुनीती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळतो. भारताचा माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्तासुद्धा त्यांचा शिष्य राहिलेला आहे. याव्यतिरिक्त सौरभने ऑल इंडिया रेडियोमध्ये ज्युनियर इंजिनीयरची नोकरीसुद्धा केलेली आहे. भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेला सौरभ आयुष्यात मेहनतीला पर्याय नसल्याचे मानतो. तसेच भविष्यात अधिकाअधिक मेहनत करून अंतिम एकरामध्ये स्थान मिळवण्याचा त्याचा मानस आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघहवाईदल
Open in App