इंदूर, भारत विरुद्ध श्रीलंका : भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर धडाकेबाज विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. या विजयाच्या जोरावर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पण या सामन्यात भारताचा खेळाडू एका रात्रीत स्टार झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारताच्या गोलंदाजांने भेदक मारा केला. श्रीलंकेला पहिला धक्का वॉशिंग्टन सुंदरने दिला. त्यानंतर कुलदीप यादवने डबल धमाका उडवला. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनेही यावेळी श्रीलंकेला दोन धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. शार्दुल ठाकूरने एका षटकात तीन धावांत तीन फलंदाजांना बाद करत श्रीलंकेला मोठा धक्का दिला.
या सामन्यानंतर सामनावीराचा पुरस्कार नेमका कोणाला मिळतो, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होता. कारण शार्दुल ठाकूरने एकाच षटकात तीन बळी मिळवले होते. तर दुसरीकडे लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी दिली होती. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि नवदीप सैनी यांनी अचूक मारा करत प्रत्येकी दोन बळी मिळवले होते. त्यामुळे सामनावीराचा पुरस्कार नेमका कोणाला मिळतो, याबाबत साऱ्यांना उत्सुकता होती.
ट्वेन्टी-२० सामन्यात आकड्यांना किंवा अंक गणितांना जास्त महत्व नसते. जो खेळाडू वेळेला चांगली कामगिरी करतो, त्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जातो. काही जणांना शार्दुलला हा पुरस्कार मिळेल, असे वाटत होते. कारण त्याच्या खात्यात तीन विकेट्स होत्या. पण त्याने तळाच्या फलंदाजांना बाद केले होते. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तो नवदीप सैनीला.
आता सैनीला सामनावीराचा पुरस्कार का देण्यात आला, यावर बरीच चर्चा रंगली. सैनीने या सामन्यात दोन बळी तर मिळवलेच, पण त्याचबरोबर दोन अप्रतिम झेलही टिपले. त्यामुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला. या सामनावीराचा पुरस्कार पटकावल्यावर सैनीवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले.