नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला असून भारतीय संघाला स्पर्धेतील आपला दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. आशिया चषकाची स्पर्धा मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी झालेल्या भारत आणि श्रीलंका (IND vs SL) या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. कारण भारताला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी इतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे.
दरम्यान, सुपर-4 मधील भारताचा दुसरा सामना गुरूवारी अफगाणिस्तानविरूद्ध होणार आहे. मंगळवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमान संघाच्या बाजूने आला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 173 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 19.5 षटकात 174 धावा करून सामना आपल्या नावावर केला. श्रीलंकेने 6 गडी राखून विजय मिळवून अंतिम फेरीकडे कूच केली आहे.
वीरेंद्र सेहवागने साधला निशाणा
भारतीय संघाला 174 धावांचा बचाव करता न आल्याने संघावर विविध स्तरातून टीका होत आहे. अशातच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने देखील गोलंदाजांवर निशाणा साधला आहे. सेहवागने क्रिकबजशी संवाद साधताना म्हटले, "भारतीय गोलंदाज 175 हून अधिक धावांचा बचाव करत नसतील तर ते ते जागतिक दर्जाचे गोलंदाज नाहीत". सेहवागने भारताच्या खेळीवर नाराजी व्यक्त करत संघ निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
श्रीलंकेच्या विजयाची हॅट्रिक
श्रीलंकेचा खेळ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर श्रीलंकेने दमदार पुनरागमन केले. सुपर-4 च्या कालच्या सामन्यात त्यांनी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतालाच बाहेर केले. भारताने विजयासाठी ठेवलेले 174 धावांचे लक्ष्य श्रीलंकेने 6 गडी व 1 चेंडू राखून रोमहर्षक रित्या पार केले. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिस ( 57) व पथूम निसंका (52) यांनी श्रीलंकेला दमदार सुरूवात करून दिली. त्यांनी पहिल्या बळीसाठी 97 धावांची भागीदारी नोंदवली. त्यानंतर दासून शनाका व भानुका राजपक्षा यांनी 34 चेंडूंत नाबाद 64 धावा करून 6 गडी राखून विजय मिळवला. शनाका 18 चेंडूंत 33 धावांवर, तर राजपक्षा 25 धावांवर नाबाद राहिला.
Web Title: Indian bowlers are not world class if they can't defend anything over 175 said virendra sehwag
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.