पहिला टी२० सामना खूप अटीतटीचा आणि रोमांचक झाला. सामना गमावल्याचे दु:ख आहेच, पण ज्याप्रकारे भारतीय संघाने झुंज दिली, त्याचा दिलासाही आहे. टी२० क्रिकेटमध्ये १२६-१२७ धावांचे लक्ष्य माफक मानले जाते आणि समोर ऑस्ट्रेलियासारखा तगडा संघ होता, पण भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त लढत दिली. आता भारतीय संघ व्यवस्थापनाला फलंदाजीवर अधिक जोर द्यावा लागेल. लोकेश राहुल आणि विराट कोहलीचा अपवाद वगळता इतर कोणी चमकले नाही. धोनीनेही धावा केल्या, पण त्यात अपेक्षित वेग नव्हता. माझ्यामते, प्रमुख फलंदाजांनी खूप चुकीचे फटके खेळले.
या पराभवानंतर उमेश यादववर मोठी टीका झाली आहे. डेथ ओव्हर्स किंवा अखेरच्या षटकात १०-१२ धावा दिल्यानंतर पराभव झाला, तर तो गोलंदाज खलनायक बनतो. नेमके असेच उमेशसोबत झाले आहे. कदाचित ऑस्ट्रेलिया संघ अतिउत्साहामध्ये होता. कारण त्यांना बहुतेक विश्वास बसत नसावा की, त्यांनी भारताला कमी धावसंख्येत रोखले आहे. उमेशविषयी म्हणायचे झाल्यास, त्याची गोलंदाजी चांगली झाली नाही, पण इतकी वाईटही नव्हती की, त्यालाच पराभवासाठी जबाबदार ठरविले पाहिजे.
धोनीविषयी म्हणायचे झाल्यास, तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन जास्तीतजास्त स्ट्राइक स्वत:कडे ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, पण रविवारी त्याची बॅट तळपलीच नाही. त्याने धावा केल्या, पण त्यासाठी चेंडू खूप खेळले. चौकार- षटकार मारण्यात त्याला यश मिळत नव्हते. त्यामुळे आता धोनीलाही आपल्या खेळीत सुधारणा करावी लागेल.
या सामन्यात भारतासाठी सर्वात चांगली बाब ठरली, ती लोकेश राहुलचा परतलेला फॉर्म. राहुलला संधी देण्यासाठी शिखर धवनला विश्रांती देण्यात आली आणि ही संधी राहुलने साधली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका राहुलसाठी विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तो असाच खेळत राहिला, तर त्याचा विश्वचषक संघात समावेश होऊ शकतो. तरी विश्वचषक तयारीसाठी टी२० मालिकेतील निकाल फारसा महत्त्वाचा ठरणार नाही, पण असे असले, तरी संघात स्थान मिळविण्यासाठी काही खेळाडूंमध्ये कडवी स्पर्धा नक्कीच लागली आहे.
माझ्या मते आतापर्यंत काही खेळाडूंचे विश्वचषक संघातील स्थान निश्चित झाले असल्याचे वाटते. यामध्ये रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव यांचा समावेश आहे. या खेळाडूंना डावलणे अशक्य आहे. त्यामुळे आता उरलेल्या स्थानासाठी अधिक विचार होईल. या स्थानांसाठी लोकेश राहुल, उमेश यादव, रवींद्र जडेजा यांच्यावर जास्त लक्ष असेल. त्यामुळे माझ्यामते आतापर्यंत ११ खेळाडू निश्चित झाले आहेत. जर हार्दिक पांड्या तंदुरुस्त झाला, तर १२ खेळाडू निश्चित होतील.
दुसऱ्या टी२० सामन्यात भारताला आता कल्पकतेने खेळावे लागेल. घरच्या मैदानावर मालिका होत असल्याने, सर्व परिस्थिती तुम्ही ओळखून आहात, याला काही महत्त्व नाही. कारण अनेक ऑस्ट्रेलयन्स भारतीय परिस्थितींना चांगल्या प्रकारे ओळखून आहेत. त्यामुळेच भारताला आता थंड डोक्याने खेळावे लागेल.
- अयाझ मेमन संपादकीय सल्लागार
Web Title: Indian bowlers give tough competition to Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.