Join us  

"ट्वेंटी-२० आणि IPL पुरता विचार करू नका", वसिम अक्रमचा भारतीय गोलंदाजांना मोलाचा सल्ला

wasim akram : भारतीय संघातील महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 4:43 PM

Open in App

wasim akram on indian bowler । नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज वसिम अक्रमने भारतीय खेळाडूंच्या सततच्या दुखापतीवर एक मोठे विधान केले आहे. भारतीय संघातील महत्त्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. दीपक चहरला देखील दुखापतीचा सामना करावा लागत आहे. धावण्याचा सराव कमी असल्यामुळे दुखापतीचे प्रमाण वाढत असल्याचे अक्रमने म्हटले आहे. तसेच सध्याच्या वेगवान गोलंदाजांनी सराव सत्रात जास्तीत जास्त षटके टाकण्याची गरज असल्याचे अक्रमने सांगितले. 

"धावण्याचा सराव करणे हे गोलंदाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मी माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या तीन वर्षांतच जिममध्ये गेलो होतो. मी लँकेशायरसाठी १० हंगाम खेळलो आणि जवळपास १००-१५० प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. पण आता तसे होत नाही, आताचे गोलंदाज दोन प्रथम श्रेणीचे सामने खेळले की सहा दिवस अंथरुणावरुन उठणार नाहीत. कारण त्यांच्या शरीराला धावण्याची, व्यायामाची सवय नाही", असे वसिम अक्रमने सांगितले.

अक्रमचा भारतीय गोलंदाजांना सल्ला दरम्यान, सामन्याच्या २-३ दिवस आधी गोलंदाजांनी नेटमध्ये कमीत कमी एक तास गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायला हवा. जर तुम्ही फक्त ३ षटके टाकली तर तुमच्या शरीराचे स्नायू सामना खेळण्यासाठी तयार राहतील अशी अपेक्षा कशी करता? मी युवा खेळाडूंना आणखी एक सल्ला देईन की, त्यांनी ४ दिवसीय क्रिकेटवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. ट्वेंटी-२० आणि आयपीएल ते ठीक आहे. पण ४ दिवस क्रिकेट खेळल्याने तुमची क्षमता आणि ताकद वाढते. कारण तुम्ही लांब स्पेल टाकता त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता कमी असते, असा सल्ला अक्रमने दिला. तो स्पोर्ट्सकीडाशी बोलत होता.

बुमराहच्या दुखापतीने वाढली डोकेदुखी जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुकणार आहे. हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. याशिवाय तो आगामी वन डे विश्वचषकात खेळणार का यावरून देखील संभ्रम आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :वसीम अक्रमआयपीएल २०२३पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराह
Open in App