महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकात न्यूझीलंड क्रिकेट संघाने बाजी मारली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन किवी संघाने किताब उंचावला. आयसीसीने सात संघांमधील काही खेळाडूंना मिळून सर्वोत्तम संघ बनवला असून यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला संधी मिळाली आहे. चॅम्पियन न्यूझीलंड आणि उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील ३-३ खेळाडूंना बेस्ट इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. याशिवाय इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सर्वोत्तम संघात आहेत.
न्यूझीलंडच्या रुपात आयसीसीला एक नवा चॅम्पियन मिळाला. महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन विश्वविजेते होण्याचा मान पटकावला. किवी संघाची युवा खेळाडू अमेलिया केर सामनावीर आणि मालिकावीर किताबाची मानकरी ठरली. तिलाही सर्वोत्तम संघात स्थान मिळाले. दरम्यान, भारतीय संघातील एकमेव खेळाडू हरमनप्रीत कौरचा बेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात हरमनने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती.
आफ्रिकेच्या महिला संघाला आपल्या पुरुष संघाप्रमाणे विश्वचषकापासून एक पाऊल दूर राहावे लागले. अमेलिया केर हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ३२ धावांनी मात करताना पहिल्यांदाच आयसीसी महिला ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १५८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ९ बाद १२६ धावांवर रोखत न्यूझीलंडने विजय साकारला.
ICC ने निवडला सर्वोत्तम संघ - लौरा वोल्वार्डत (कर्णधार), डॅनियल वॅट, तझ्मीन ब्रिट्स, अमेरिया केर, हरमनप्रीत कौर, डेन्ड्रा डॉटीन, निगर सुल्ताना, फ्लेचर, रोसमरी मैर, मेगन शट, नोनकुलूको मलबा, (१२ वा खेळाडू - एडन कार्सन)