नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) शानदार खेळीची आयसीसीने दखल घेतली आहे. इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेतील अविस्मरणीय कामगिरीनंतर सप्टेंबर 2022 साठी हरमनप्रीत कौरला सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय संघ सध्या बांगलादेशच्या धरतीवर आशिया चषक खेळत आहे. या स्पर्धेत देखील संघाने शानदार कामगिरी करून 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरने या स्पर्धेत अद्याप मोठी खेळी केली नाही. सध्या सुरू असलेल्या थायलंडविरूद्धच्या सामन्यात कौरला विश्रांती देण्यात आली असून कर्णधारपदाची धुरा मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आली आहे.
भारतीय कर्णधाराने मारली बाजी खरं तर हरमनप्रीत कौर, भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना आणि बांगलादेशच्या संघाची कर्णधार निगार सुलताना यांच्यात स्पर्धा रंगली होती, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरने बाजी मारली आहे. कौरला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तिने म्हटले, "पुरस्कारासाठी नामांकन मिळणे खूप छान क्षण होता आणि ते जिंकणे ही एक आश्चर्यकारक भावना आहे." तसेच ICC ची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निवड होणे ही माझ्यासाठी वैयक्तिक आणि भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून विशेष ओळख आहे, असे हरमनप्रीतने अधिक म्हटले.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच धरतीवर 3-0 ने एकदिवसीय मालिकेत पराभूत केले होते. लक्षणीय बाब म्हणजे भारताने 1999 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. हरमनप्रीत कौरने या मालिकेत नेतृत्व केले आणि 221 च्या सरासरीने आणि 103.27 च्या स्ट्राईक रेटने 221 धावा करून सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. तिने पहिल्या दोन सामन्यांमध्ये फिनिशरची भूमिका निभावली होती.
हरमनप्रीतचे शानदार शतक इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हरमनप्रीतने 74 धावांची नाबाद खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. तर दुसऱ्या सामन्यात तिने केवळ 111 चेंडूमध्ये 143 धावांची शतकी खेळी केली, ही तिची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ठरली आहे.