Join us  

IND vs SL: श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ; राहुल-रोहित होणार संघाबाहेर

Rohit Sharma And KL Rahul: 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 3:36 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता संघाला मायदेशात ट्वेंटी-20 मालिका खेळायची आहे. खरं तर श्रीलंकेचा संघ नववर्षात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळवली जाईल. मात्र, मालिकेच्या आधीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुल आगामी श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे. 

वृत्तसंस्था एएनआने सूत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुल हे आगामी श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला बांगलादेशविरूद्धच्या वन डे मालिकेत दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो कसोटी मालिकेला देखील मुकला होता. मात्र, ही दुखापत अद्याप ठीक झाली नसल्यामुळे आगामी मालिकेत देखील त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच लोकेश राहुल विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे तो आगामी मालिकेतून माघार घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत झाली होती दुखापत खरं तर भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धची वन डे मालिका गमावली होती. मात्र मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली असताना देखील त्याने शानदार खेळी केली. दुखापतीमुळे रोहितला सामन्याच्या मध्यातून रूग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना संघाला गरज असताना रोहित नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि अर्धशतकी खेळी केली. रोहितने त्या सामन्यात 29 चेंडूत 51 धावांची खेळी केली मात्र त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली. अखेर बांगलादेशने 2-1 ने मालिकेवर कब्जा केला. 

भारत विरूद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक 

  • 3 जानेवारी, मंगळवार - पहिला ट्वेंटी-20 सामना, मुंबई
  •  5 जानेवारी, गुरूवार - दुसरा ट्वेंटी-20 सामना, पुणे 
  • 7 जानेवारी, शनिवार - तिसरा ट्वेंटी-20 सामना, राजकोट 
  • 10 जानेवारी, मंगळवार, पहिला वन डे सामना, गुवाहटी
  • 12 जानेवारी, गुरूवार, दुसरा वन डे सामना, कोलकाता
  • 15 जानेवारी, रविवार, तिसरा वन डे सामना, त्रिवेंद्रम

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकालोकेश राहुलरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App