Rohit Sharma gets emotional : ट्वेंटी-२०, वन डे आणि कसोटी या तीनही फॉरमॅटचे कर्णधारपद आता रोहित शर्माकडे आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहितचेच नाव आघाडीवर होते. रोहितने पूर्णवेळ कर्णधार म्हणून दणक्यात सुरुवात करताना एकामागून एक मालिका विजयांचा सपाटा लावला आहे. त्यात कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित प्रथमच मोहालीच्या मैदानावर उतरला आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना डावाच्या फरकाने जिंकून इतिहास घडवला. या ऐतिहासिक विजयानंतर BCCI ने रोहितची मुलाखत घेतली आणि त्यात हिटमॅन भावूक झालेला पाहायला मिळाला. कसोटी संघाचे नेतृत्व करीन असा स्वप्नातही विचार केला नव्हता, अशी प्रांजळ कबुली रोहितने दिली.
भारत-श्रीलंका मालिकेपूर्वी रोहितची भारतीय कसोटी संघाचा ३५वा कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या कसोटीत १ डाव व २२२ धावांनी मोठा विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माने भारताचा कर्णधार म्हणून ४२ सामन्यांत ३६ विजय मिळवले आहेत, तर ६ सामने गमावले आहेत. हा त्याचा सलग १३ वा विजय ठरला.
२१व्या दशकात कसोटी संघाचा कर्णधार म्हणून पदार्पणाचा सामना जिंकणारा रोहित हा पाचवा कर्णधार ठरला. याआधी रिडीली जेकब्स, ग्रॅमी स्मिथ, केन विलियम्सन, क्विंटन डी कॉक यांनी हा पराक्रम केला आहे. पॉली उम्रीगर यांच्यानंतर कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत डावाने विजय मिळवणारा रोहित शर्मा हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. पॉली उम्रीगर यांनी १९५५/५६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीत एक डाव व २७ धावांनी विजय मिळवला होता.
रोहित शर्मा म्हणाला, भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे आणि या यादीत आता माझ्याही नावाचा समावेश झाला आहे. याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.'' ३४ वर्षीय रोहितने या कसोटीत फक्त २९ धावा केल्या. पण, त्याने नेतृत्वकौशल्य दाखवताना सेट केलेली फिल्डींग, DRS चे योग्य निर्णय आणि गोलंदाजांचा योग्य वापर यामुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले.
म