Rohit Sharma । नवी दिल्ली : भारतीय संघासमोर दुखापत ही मोठी समस्या आहे. मागील काही वर्षांत अनेक खेळाडू सततच्या दुखापतीनुळे त्रस्त आहेत. भारतीय संघातील असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्या कारकिर्दीवर दुखापतीचा मोठा परिणाम झाला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह. बुमराह दुखापतीच्या कारणास्तव मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. अशातच संघाचा कर्णधार रोहित शर्माला खेळाडूंच्या दुखापतीबाबत विचारले असता तो म्हणाला की, संघातील नियमित खेळाडूंना सतत दुखापत होत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
दरम्यान, बुमराहच्या पाठोपाठ आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. या आधी अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे त्रस्त होता. खेळाडूंच्या सततच्या दुखापतीवर कर्णधार रोहित शर्माने चिंता व्यक्त केली आहे. रोहितच्या म्हणण्यानुसार, संघातील अशा खेळाडूंना दुखापत होत आहे, जे सतत प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा राहिले आहेत. त्याचा संघावर मोठा परिणाम होत आहे.
विश्वचषकासाठी 15 खेळाडू तयार आहेत - रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने म्हटले, "ही खरंच चिंतेची बाब आहे. प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेले खेळाडू आपण गमावत आहोत. सर्व खेळाडू उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. आम्ही देखील खेळाडूंच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहोत आणि म्हणूनच आम्ही काही खेळाडूंना ठराविक कालावधीसाठी विश्रांती देतो. आमच्या बाजूने आम्ही खेळाडूंना चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत. खेळाडूंना सतत दुखापत का होते हे सांगण्यासाठी मी जरी तज्ञ नसलो तरी एक सांगू शकतो की, आमची वैद्यकीय टीम या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे आणि विश्वचषकापर्यंत आमचे सर्वोत्तम 15 खेळाडू तयार असतील याची खात्री आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"