IND vs NZ Live Match Updates In Marathi | मुंबई : तमाम भारतीयाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या इराद्याने आज भारतीय संघ मैदानात उतरला आहे. १० वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघावर आहे. आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी सामना होत आहे. २०१९ च्या विश्वचषकात देखील भारताचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना झाला होता. पण, किवी संघाने भारताला पराभूत करून भारतीयांच्या स्वप्नावर पाणी टाकले होते. त्यामुळे आज भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करून मागील पराभवाचा बदला घेणार का हे पाहण्याजोगे असेल. खरं तर यंदा परिस्थिती वेगळी असून भारतीय संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. आजच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ -केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिन कॉन्वे, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, मार्क चॅपमॅन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, मिचेल सॅंटनर, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट.
दरम्यान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. आज यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या उपांत्य सामना होत आहे, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका भिडणार आहे. भारतीय संघाने सलग नऊ विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. तर इतर तीन संघांनी देखील बलाढ्य संघांना नमवून इथपर्यंत मजल मारली आहे.
भारताची ऐतिहासिक कामगिरीभारतीय संघाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने ४ गडी गमावून ४१० धावांची विशाल धावसंख्या उभारली. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी शतकी खेळी करून भारताच्या नवव्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अय्यरने नाबाद १२८ धावा केल्या तर राहुलने १०२ धावांचे योगदान दिले. ४११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ २५० धावांत आटोपला. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वातील नेदरलँड्सला यंदाच्या विश्वचषकात ९ सामन्यांमध्ये २ विजय मिळवता आले. पण, नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. त्यांनी आफ्रिकेला ३८ तर बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले.