Rohit Sharma Ravi Bishnoi, India vs West Indies 1st T20 : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजसारख्या तगड्या पॉवर हिटर असणाऱ्या संघाला पहिल्या टी२० सामन्यात पराभवाची धूळ चारली. भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली फिरकीपटू रवी बिश्नोई याने. त्याने ४ षटके टाकत केवळ १७ धावा दिल्या आणि २ महत्त्वाचे बळी टिपले. विशेष म्हणजे हा त्याचा पदार्पणाचा सामना होता. त्यात त्याने मोक्याच्या क्षणी एकाच षटकात दोन बळी टिपले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताबही मिळाला. रवी बिश्नाईच्या या यशाबद्दल कर्णधार रोहित शर्माने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली.
"वेस्ट इंडिजसारख्या तगड्या फलंदाजांच्या संघाला १५७ धावांपर्यंत रोखणं हे कौतुकास्पद आहे. फलंदाजीमध्ये आम्ही फारसे परिणामकारक दिसलो नाही. पण आम्हाला त्यातून बरंच काही शिकता आलं. गोलंदाजीत रवी बिश्नोईने चांगली कामगिरी केली. तो अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे यात दुमत नाही. त्याच्या गोलंदाजीत एक वेगळेपण आहे. ते पाहूनच आम्ही त्याला आमच्या संघात स्थान दिलं", असं रोहित रवीच्या संघातील निवडीबाबत म्हणाला.
"रवी बिश्नोई पॉवर प्ले पासून ते शेवटच्या षटकापर्यंत कोणत्याही टप्प्यात गोलंदाजी करू शकतो. त्याच्यामुळेच आम्हाला गोलंदाजीत विविध पर्यायांचा वापर करता आला. त्याने पहिल्याच सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली, याचा आम्हाला आनंद आहे. त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे. त्यामुळे तो चांगली कामगिरी करणार यात वादच नाही. आता कर्णधार म्हणून मला आणि भारतीय संघाला त्याचा योग्य वापर करून घेतला पाहिजे", असं सूचक विधान रोहितने केलं.