मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपद जिंकणारच, असा विश्वास चाहत्यांना आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही नव्या विक्रमाला गवसणी घालणारी असते. त्याच्या बॅटीतून चौकार-षटकारांची आतषबाजी पाहण्यासाठी सर्वच आतूर आहेत. पण, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वीच कोहली करोडपती झाला आहे. आतापर्यंत एकाही क्रिकेटपटूला गाठता न आलेला 'विराट' टप्पा त्यानं गाठला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात परदेशात कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकांमध्ये आपला दबदबा दाखवून दिला आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत वन डे व कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम कोहलीनं करून दाखवला. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड येथे वन डे मालिका जिंकण्याचा विक्रमही कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने करून दाखवला. त्यामुळे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपदाच्या दावेदारांत भारतीय संघ आघाडीवर आहे.
क्रिकेटच्या मैदानांवर विक्रमाचे शिखर सर करणाऱ्या कोहलीनं सोशल मीडियावरही आपली हुकुमत गाजवली आहे. सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 10 कोटींच्या वर गेली आहे आणि इतके फॉलोअर्स असणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
कोहली आणि धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये फरक काय, सांगतोय जाँटी रोड्स
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्या कॅप्टन्सीवर बऱ्याच चर्चा होत आहेत. या दोघांच्या कॅप्टन्सीमध्ये नेमका काय फरक आहे, हे दक्षिण आफ्रिकेचा माजी महान क्रिकेटपटू जाँटी रोड्सने सांगितले आहे. याबाबत जाँटी म्हणाला की, " धोनी आणि कोहली या दोघांचे स्वभाव भिन्न आहेत. त्यामुळे त्यांची नेतृत्वशैलीही वेगळी आहे. धोनी हा चांगली रणनीती आखतो. समोरच्या खेळाडूची मानसीकता ओळखतो. त्यानुसार तो आपल्या संघातील खेळाडूंकडून कामगिरी करून घेतो. पण दुसरीकडे कोहली हा आपल्या कामगिरीच्या जोरावर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो. कर्णधाराने स्वत: दमदार कामगिरी करून संघापुढे आदर्श निर्माण करावा, अशी कोहलीची शैली आहे."
Web Title: Indian captain Virat Kohli became first cricketer to have 100 million followers on Social Media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.