सेंच्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरिअन कसोटीत सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्याशी हुज्जत घालणं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला महागात पडलं आहे. आयसीसीने कोहलीवर दंडात्मक कारवाई केली आहे. आयसीसीचा कोड ऑफ कंडक्ट लेवल 1 या नियमाचं भंग केल्याप्रकरणी कोहली दोषी आढळला आहे. सामनाधिका-यांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी कोहलीला त्याच्या कसोटी मानधनाच्या 25 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरू करण्याचा पंचांचा निर्णय विराटला पसंत पडला नव्हता. मैदानाचा काही भाग ओलसर असल्यामुळे चेंडु सतत ओला होऊन गोलंदाजांना याचा त्रास होत असल्याची तक्रार कोहलीने मैदानातील पंचांकडे केली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना चेंडूवर ग्रिप घेणं कठीण होत असल्याचा विराटचा दावा होता. पण पंचांनी तो मान्य न केल्याच्या रागात भारतीय कर्णधाराने चेंडू जोरात मैदानात आपटला. यानंतर अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ पुन्हा थांबवण्यात आला. केवळ पाच षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे पंचांच्या भूमिकेवर चिडलेल्या कोहलीने थेट सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्या कक्षात जाऊन घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या दरम्यान, कोहली आणि ब्रॉड यांच्यात खटके उडाल्याचंही वृत्त आहे.
या प्रकरणात सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी विराटवर मानधनाच्या 25 टक्के रकमेचा दंड आणि एक दंड गुण अशी कारवाई केली.