India vs England, ODI Series, Pune: इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळालेल्या सूर्यकुमार यादवनं दमदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील सूर्यकुमार यादववर खूष आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेआधी विराट कोहलीनं सूर्यकुमार यादवबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. (Virat Kohli Praises Suryakumar Yadav Before India vs England ODI Series)
"मी संघात चौथ्या क्रमांवरही खेळलो आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजीचाही अनुभव आहे. एक सलामीवर म्हणून मला स्वत:ची भूमिका लक्षात घ्यावी लागेल. जेणेकरुन सूर्यकुमारसारख्या खेळाडूसाठी मला संघात तिसऱ्या क्रमांकाची जागा तयार करता येईल. तो सध्या ज्यापद्धतीनं खेळतो आहे ते जर कायम राहिलं तर मला संघात त्याच्यासाठी जागा तयार करावी लागेल आणि मलाही संघाच्या गरजेनुसार खेळावं लागेल", असं विराट कोहली म्हणाला.
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत विराट कोहलीनं भारतीय संघातलं आपलं फलंदाजीचं तिसरं स्थान सूर्यकुमार यादवसाठी सोडलं होतं. विराट दोन सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर तर शेवटच्या सामन्यात सलामीला फलंदाजीला उतरला होता. सूर्यकुमारला संघात संधी मिळताच त्यानं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी एकदिवसीय मालिकेतही सूर्यकुमार यादवला अंतिम ११ जणांमध्ये समाविष्ट करुन घेण्यासाठी विराट कोहली उत्सुक आहे.
सूर्यकुमार यादवसोबतच भारतीय संघात वनडे मालिकेसाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि अष्टपैलू कृणाल पांड्या हे देखील नवे चेहरे दिसणार आहेत. दरम्यान, भारतीय संघाची सुरुवात रोहित शर्मा आणि शिखर धवन करणार असल्याचं याआधीच कोहलीनं जाहीर केलं आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सलामीचा तिढा सुटल्याचं सांगितलं जात आहे. पण सूर्यकुमार यादवला भारतीय संघात संधी द्यायचं झाल्यास संघातून कुणाचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
केएल राहुलची कोहलीकडून पाठराखण
केएल राहुलच्या खराब कामगिरीबाबत कर्णधार विराट कोहलीनं त्याची पाठराखण केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. एखाद्या खेळाडूच्या फॉर्मबाबत संघ नक्कीच चिंता करत असतो. पण चांगल्या खेळाडूच्या पाठिशी उभं राहणं देखील संघाचं कर्तव्य असतं, असं कोहली म्हणाला. "जेव्हा लोक एखाद्या खेळाडूच्या खराब फॉर्मबाबत चर्चा करत असतात तेव्हा मला फक्त एकच गोष्ट आठवते ती म्हणले, 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोडो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रैना' लोकांना एखाद्यावर टीका होत असलेलं ऐकायला खूप आवडतं", असं कोहली म्हणाला.
Web Title: indian captain virat kohli praises suryakumar yadav before india england odi series pune
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.