U19 World Cup, IND vs AUS: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार यश धूलचं शतक आणि शेख रशिदची ९४ धावांची खेळी याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला २९१ धावांचं आव्हान दिलं होतं. पण यजमानांना हे आव्हान पेललं नाही. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ १९४ धावांवर बाद झाला. या विजयामुळे भारताने सलग चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यात महत्त्वाची बाब म्हणजे भारताचा कर्णधार यश धूलने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या पराक्रमाशी बरोबरी केली.
भारताच्या यश धूलने दमदार खेळ करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याने ११० चेंडूत ११० धावा केल्या. यात खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार खेचला. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. शतकी खेळीसह यश धूलने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. यश धूल हा U19 वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकणार तिसरा भारतीय कर्णधार ठरला. याआधी विराट कोहली आणि उन्मुक्त चंद या दोघांनी ही कामगिरी केली होती. कोहलीने २००८ साली तर उन्मुक्त चंदने २०१२ साली ही कामगिरी केली होती. त्यानंतर तब्बल १० वर्षांनी भारताला शतकवीर कर्णधार सापडला.
योगायोग म्हणजे हे दोन्ही खेळाडूही यश धूलप्रमाणे दिल्लीचेच आहेत. याशिवाय, १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या बाद फेरीत शतक झळकावणारा यश धूल हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी चेतेश्वर पुजारा (१२९), उन्मुक्त चंद (१११), रवनीत रिकी (१०८) आणि यशस्वी जैस्वाल (१०५) यांनी ही कामगिरी करून दाखवली होती.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने २९० धावा केल्या. यश धुलने ११० धावा केल्या. तर रशिदने ८ चौकार व १ षटकारासह ९४ धावा केल्या. २९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियचा संघ १९४ धावांतच बाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाची दुसरी जोडी कॅम्पबेल आणि मिलर यांनी ६८ धावांची भागीदारी केली. पण ती जोडी फुटल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज हजेरी लावून माघारी परतले. लेचनन शॉ याने सर्वाधिक ५१ धावा केल्या. पण अखेर भारताताच विजय झाला.
Web Title: Indian Captain Yash Dhull equals Virat Kohli record for scoring hundred also shares unique coincidence U19 World Cup IND vs AUS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.