भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतो. २००७ आणि २०११ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या गौतम गंभीर आगामी आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायझीत परतला आहे. लखनौ सुपर जायंट्सला मागील दोन पर्वात मार्गदर्शन करताना त्याने फ्रँचायझीला प्ले ऑफपर्यंत पोहोचवले होते. त्याने भारतीय प्रशिक्षक आणि परदेशी प्रशिक्षक यांच्यात तुलना करताना मोठं विधान केलं आहे.
भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलपर्यंत धडक मारली होती. भारतीय संघाचा प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्ये भारतीय सदस्य असल्याने हा पॉझिटिव्ह निकाल पाहायला मिळाला. तोच बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफमध्ये सर्व परदेशी होती. त्यांना बाद फेरीतही पोहोचता आले नाही.
''वर्ल्ड कपमध्ये भारत किती चांगला खेळला हे आम्ही पाहिले आणि यावरून आम्हाला बाहेरच्या कोणाचीही गरज नाही हे सिद्ध होते. आमचे प्रशिक्षक कोणत्याही परदेशी प्रशिक्षकांपेक्षा कमी नाहीत, हेही यावरून दिसून येते. आमची समस्या अशी आहे की आम्ही कदाचित त्या पद्धतीने प्रेझेंटेशन करू शकत नाही, लॅपटॉप वापरू शकत नाही किंवा इंग्रजी बोलू शकत नाही. आम्ही त्या कॉर्पोरेट संस्कृतीतून आलेलो नाही, परंतु आम्हाला मैदानावर कसे काम करायचे आणि पायाभूत काम कसे करायचे हे माहित आहे,''असे गौतम गंभीर स्पोर्ट्सकीडासोबत बोलताना म्हणाला. त्या चर्चेत पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमही उपस्थित होता. गौतम गंभीरने नमूद केले की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट संघांना दोन देशांच्या माजी खेळाडूंनी प्रशिक्षण केले पाहिजे. "आम्ही १० वर्षांपूर्वी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेले देश नाही. आमच्याकडे वर्ल्ड कप जिंकणारे खेळाडू आहेत. एका भारतीयाने भारतीय संघाचे प्रशिक्षक केले पाहिजे, तर पाकिस्तानने पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक केले पाहिजे," असे गौतम गंभीर पुढे म्हणाला.
"आमच्याकडे असे अनेक महान खेळाडू आहेत ज्यांनी वर्ल्ड कप जिंकले आहेत, त्यामुळे त्यांना कोचिंग सेटअपमध्ये यायचे असेल, तर भारत आणि पाकिस्तानने त्यांना प्रशिक्षक म्हणून पाठीशी घालणे आवश्यक आहे. खेळात भावना खूप महत्त्वाच्या असतात, संघात स्थान मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेता घाम गाळता. भारताने राहुल द्रविडला मुदतवाढ दिली नसती, तर मला आशा होती की त्याची जागा भारतीयानेच घेतली असती," असेही गंभीर म्हणाला.