मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी रात्री ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. आयपीएल संपल्यानंतर यूएईवरुनच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. परंतु, या दौऱ्यासाठी निवडलेला संघ पाहून सर्व चाहत्यांना धक्काही बसला. कारण दुखापतग्रस्त असल्याने ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा (Rohit Sharma) या दौऱ्यासाठी समावेश करण्यात आलेला नाही. त्याचवेळी, रोहित मात्र मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नेट्स प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाल्याने माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही रोहितच्या दुखापतीबाबत शंका व्यक्त केली आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारताच्या संघात एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासाठी दुखापतग्रस्त रोहित ऐवजी लोकेश राहुलची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली. मात्र, जेव्हा बीसीसीआयने संघाची घोषणा केली, तेव्हा रोहित मुंबई इंडियन्सच्या नेट्स प्रॅक्टिसमध्ये चांगल्याप्रकारे फटकेबाजी करत होता. या सराव सत्राचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत हँडलवर पोस्टही केला आहे.
त्यामुळेच भारताचे लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी रोहितच्या दुखापतीविषयी शंका व्यक्त केली आहे. ‘जर रोहितची दुखापत खरंच गंभीर असती, तर त्याने नेट्समध्ये फलंदाजीचा सराव केला नसता,’ असे गावसकर म्हणाले. त्यांनी एका क्रीडा वाहिनीला सांगितले की, ‘चाहत्यांना हे जाणून घ्यायचा अधिकार आहे की, रोहितचा समावेश टीम इंडियामध्ये का नाही? बीसीसीआयने यामागचे कारण स्पष्ट करायला हवे. त्याला नेमके कोणत्या कारणामुळे संघाबाहेर ठेवण्यात आले हे कळालेच पाहिजे. रोहितच्या दुखापतीबाबत पूर्ण माहिती दिली पाहिजे.’
गावसकर पुढे म्हणाले की, ‘माझ्या मते फ्रेंचाईजी रोहितला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडू इच्छित नाही. त्यांना ही स्पर्धा जिंकायची आहे. प्रतिस्पर्धी संघाला यामुळे मानसिक फायदा होईल, अशी त्यांची अजिबात इच्छा नाही. पण आपण सध्या भारतीय संघाविषयी चर्चा करत आहोत.’