रोहित शर्माला टीम इंडियाचा नवा वनडे कर्णधार बनवण्यात आले आहे. 2021 च्या टी20 विश्वचषकानंतर रोहितकडे टी20 संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. आता तो वनडेमध्येही टीम इंडियाचे नेतृत्व करेल. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेटमध्ये स्प्लिट कॅप्टन्सी आणि रोहितला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी कर्णधार बनवण्याबाबत मत व्यक्त केले आहे. रोहित हा, संघात असलेल्या संसाधनांचा चांगल्या प्रकारे फायदा घेतो कर्णधार आहे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.
'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले, 'तो (रोहित शर्मा) कुणालाही प्रभावित करण्याचा विचार करत नाही. तो संघासाठी जे सर्वोत्तम आहे, ते करतो. संघातील प्रत्येक खेळाडूचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा हे त्याला फार चांगल्या प्रकारे समजते. शास्त्री आपल्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ आठवत म्हणतात, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना प्रत्येक फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये पाहून मला अत्यंत आनंद होतो आणि अभिमान वाटतो.
शास्त्री 2014 मध्ये टीम इंडियाशी जोडले गेले होते. मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी ते संचालक म्हणून संघाशी जोडले गेले. यानंतर, अनिल कुंबळेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 2017 मध्ये संपल्यानंतर, शास्त्री मुख्य प्रशिक्षक झाले होते.
शास्त्री म्हणाले, “आम्ही दोन समान विचारसरणीचे लोक होतो. आमचे विचार सारखेच होते. 2014 मध्ये टीम इंडियामध्ये एमएस धोनी हेच एकमेव नाव होते आणखी कोण होते? जो सुपरस्टार बनू शकला असता, विराट कोहली आणि रोहित शर्मा. या दोघांनी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आणि कसोटी क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली, ती अभूतपूर्व होती. एक उत्तम पेस अटॅक असणे आणि ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच हरवणे हे सर्व फारच खास होते.