अहमदाबाद-
भारतीय क्रिकेट संघाची वेस्ट इंडिज विरुद्ध आजपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ पहिल वनडे सामना खेळणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झाल्यानं भारतीय संघ आज पहिल्या वनडे सामन्यात लता दीदींना आदरांजली वाहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लता दीदींच्या जाण्यानं सरकारकडून याआधीच दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. लता दीदींच्या निधनाच्या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ आज वेस्ट इंडिजवरुद्धच्या सामन्यात दंडावर काळी पट्टी बांधून खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच सामना सुरू होण्याआधी मौनव्रत बाळगून लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
बीसीसीआयनं देखील ट्विटरच्या माध्यमातून लता दीदींना आदरांजली वाहिली आहे. लता दीदी या श्रेष्ठ गायिका असल्या तरी त्यांना क्रिकेटचीही आवड होती. भारताने १९८३ साली जिंकलेल्या विश्वचषकापासून ते महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीपर्यंत त्यांचं क्रिकेटशी वेगळच नातं जोडलेलं होतं.
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ साली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीमसाठी स्पेशल कॉन्सर्ट करुन टीम इंडियासाठी लतादिदींनी निधी उभारला होता. तर, सचिन तेंडुलकर आणि त्यांचं नातं हे आई-मुलांच्या नात्यासारखंच होतं. त्यामुळेच, सचिनच्या इच्छेनुसार आणि आग्रहाखातर लतादीदी एक गाणं नेहमीच म्हणायच्या. तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा.... हे गाणं सचिनसाठी लती दिदींनी एका कार्यक्रमात गायलं होतं. तर, महेंद्रसिंह धोनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही लता दिदींनी आपल्या भावना ट्विट करुन व्यक्त केल्या होत्या.