भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. मागील काही दिवसांपासून भारताचे अनेक माजी खेळाडू आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या संभाव्य १५ खेळाडूंची नावे सांगत आहेत. काहींच्या मते हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) संघात असायला हवा, तर काहींनी ऑल राऊंडरच्या नावावर कट मारली आहे. आज इरफान पठाणने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात हार्दिकबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. T20 WC साठी भारतीय संघात निवडीसाठी हार्दिकला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, असे इरफान पठाण म्हणाला.
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
''भारतीय क्रिकेटने हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की त्यांनी हार्दिक पांड्याला आतापर्यंत जितके प्राधान्य दिले आहे तितके त्याला देऊ नये. कारण त्याने अद्याप वर्ल्ड कप जिंकलेला नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही प्राथमिक अष्टपैलू खेळाडू आहात, तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर असा प्रभाव पाडण्याची गरज आहे. जोपर्यंत अष्टपैलू खेळाडूचा संबंध आहे तोपर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर असा प्रभाव पाडलेला नाही, आम्ही फक्त संभाव्यतेचा विचार करत आहोत,''असे इरफान म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की,''आयपीएलमधील कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय कामगिरी यात आपण गोंधळून जात आहोत. हा मोठा फरक आहे. सर्वप्रथम त्याला वर्षभर खेळावे लागेल. भारतीय क्रिकेटने व्यक्तींना प्राधान्य देणे थांबवायला हवे. जर तुम्ही तसे केले तर तुम्ही मोठ्या स्पर्धा जिंकणार नाही. ऑस्ट्रेलिया गेली अनेक वर्षे सांघिक खेळाला प्राधान्य देत आहेत. प्रत्येकाला सुपरस्टार बनवत आहे. त्यांच्या संघात एक सुपरस्टार नाही, प्रत्येकजण सुपरस्टार आहे. जर तुम्ही तसे केले नाही तर तुम्ही मोठ्या स्पर्धा जिंकू शकणार नाही.”
पठाणने स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात फिनिशर आणि सीम बॉलर निवडण्यात येणाऱ्या समस्यांबद्दल मत मांडले. “वर्ल्ड कप स्पर्धेत मला याचीच भीती वाटते. पाहा, माझी चिंता टी-२० विश्वचषकाची आहे, आम्ही वरच्या फळीतील फलंदाजीचा विचार केला आहे. रवींद्र जडेजा हा सातव्या क्रमांकाचा फलंदाज आहे, असे आम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एका चांगल्या फिनिशरची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्ट्राईक रेटचा विचार करता जडेजाचा तो इतका चांगला नाही. जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त, जर मी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या मुलांकडे पाहिले, जे आयपीएलपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या मालिकेत खेळले होते, तर ते चित्रही आश्वासक नाही. त्यामुळे हे दोन विभाग मला खरोखरच काळजीत टाकतात.''