नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेत विश्वात सर्वात जास्त चर्चा आहे ती भारतीय संघाची. गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला झेंडा उंचावलेला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्येही (आयसीसी) भारताचे सर्वात जास्त वजन आहे. भारतीय संघानेही एकामागोमाग विजय मिळवत अव्वल स्थानही पटकावले होते. पण तरीही भारतीय क्रिकेट या गोष्टीमध्ये अजूनही पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.
प्रत्येक जण काळाबरोबर राहण्याचा प्रयत्न करत असतो. पण भारतीय क्रिकेटचे मात्र तसे होताना दिसत नाही. कारण 2007 साली जेव्हा ट्वेन्टी-20 क्रिकेट विश्वचषक खेळायचे आयसीसीने ठरवले होते, तेव्हा बीसीसीआयने नाक मुरडलं होतं. पण त्यानंतर मात्र बीसीसीआयने आयपीएल ही ट्वेन्टी-20 प्रकारालीत लीग सुरु केली. सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये काही वारे वाहायला केव्हाच सुरुवात झाली आहे. पण बीसीसीआयने मात्र त्यासाठी अजूनही पुढाकार घेतलेला दिसत नाही. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनीही ही खंत व्यक्त केली आहे.
सध्याचा जमाना हा फास्ट आहे. कुणाला जास्त वेळ नाही. त्यामुळेच ट्वेन्टी-20 हा क्रिकेटचा प्रकार अधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. पण एकीकडे ट्वेन्टी-20 क्रिकेट लोकप्रिय होत असताना कसोटी क्रिकेटकडे मात्र जास्त लोकं वळताना दिसत नाहीत. त्यामुळे आयसीसीने दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्यांचा उपाय सुचवला आहे. प्रायोगिक तत्वावर दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामने जवळपास बऱ्याच देशांनी खेळले आहेत. आयसीसीमधील कसोटी क्रिकेट दर्जा असलेले भारत आणि बांगलादेश या दोनच देशांनी दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामने खेळलेले नाहीत. भारतात एका दौऱ्याच्या वेळी दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामना खेळवायचे ठरलेही होते, पण बीसीसीआयने अखेरच्या क्षणी हा प्रयोग रद्द करण्याचे ठरवले. बीसीसीआय दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामने खेळायला का धजावत नाही, या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही मिळताना दिसत नाही. काहींच्या मते खेळाडूंना वेळेच्या गणिताशी जुळवून घेताना समस्या जाणवेल, असे बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना वाटत असल्याचे समजते.
चौधरी यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना एका पत्रामध्ये आपली ही व्यथा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर खेळाडूंना वेळच्या गणिताची समस्या जाणवणार नाही, याचे उत्तम उदाहरणही चौधरी यांनी दिले आहे. आपल्या पत्रामध्ये चौधरी म्हणाले की, भारतीय संघातील महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांनी आतापर्यंत1855 मर्यादीत षटकांचे सामने खेळले आहेत. यामध्ये आयपीएलच्या सामन्यांचही समावेश आहे. हे सारेच सामने दिवस-रात्र खेळवले जातात. त्यामुळे दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामने खेळण्यासाठी भारतीय खेळाडूंना कोणतीही समस्या जाणवणार नाही.