केपटाऊन - दक्षिण आफ्रिका दौ-यावर असणा-या भारतीय क्रिकेट संघाला दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. केपटाऊन शहरात सध्या चांगलाच दुष्काळ पडला आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत. भारतीय संघालाही दुष्काळाचा फटका बसला असून सराव केल्यानंतर किंवा सामना संपल्यानंतर फक्त 90 सेकंदात आंघोळ उरकून घ्या अशी सूचना करण्यात आली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यापासूनच पाण्याची समस्या सुरु आहे. कसोटी मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघाला दोन मिनिटात आंघोळ करण्याची सूचना देण्यात आली होती.
केपटाऊन सध्या दुष्काळचा सामना करत आहे. दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत चालली असून, त्यासाठी गरजेचे सर्वोपतरी प्रयत्न सुरु आहेत. याआधी पाणी वाचवण्यासाठी एका व्यक्तीला दिवसाला फक्त 87 लीटर पाणी देण्याची परवनागी स्थानिक प्रशासनाने दिली होती. पण केपटाऊनमधील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून पाण्याचा स्तर खालावत आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक व्यक्तीला 50 लीटरपेक्षा अधिक पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
पाण्याच्या याच समस्येमुळे केपटाऊनमध्ये सर्व स्थानिक स्तरावरील क्रिकेट सामने बंद ठेवण्यात आले आहेत. फक्त दक्षिण आफ्रिका आणि भारतातील आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळवण्यात येत आहेत.
केपटाऊनशी संबंधित एका अधिका-याची पिण्यायोग्य असणा-या पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या वापरावर नजर असते. येथे पाणी लेव्हल 6 वर पोहोचलं आहे. याचा अर्थ पाण्याचा वापर रोपटी, पूल आणि इतर कामांसाठी केला जाऊ शकत नाही. जर एखाद्या नागरिकाने आदेशाचं पालन केलं नाही तर एक लिटर पाण्यासाठी जवळपास 51 हजारांचा दंड ठोठावण्यात येतो.