IND vs ENG 5th Test । धर्मशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा धर्मशाला येथे पोहोचला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या विवाहपूर्व सोहळ्यासाठी तो जामनगरला गेला होता. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर हिटमॅन आपल्या राष्ट्रीय कर्तव्यावर परतला आहे.
खरं तर रोहितने भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह क्रीडा महाकुंभसाठी हजेरी लावली होती. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते. मंगळवारी तो खासगी हेलिकॉप्टरने धर्मशाला येथे दाखल झाला. पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने चौथ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील पाचवा कसोटी सामना हा ७ मार्चपासून हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी धर्मशालातील हवामानाने दोन्ही संघांची चिंता वाढवली आहे. हा सामना सुरू असताना धर्मशालामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गारपीटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रोहित शर्मा धर्मशाला येथे दाखल
दरम्यान, बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल केला. लोकेश राहुल पाचव्या कसोटीला देखील मुकणार आहे. उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र रांची कसोटीनंतर विश्रांती घेत धर्मशाला येथे ७ मार्चपासून सुरू होत असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत खेळणार आहे. राहुलच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चार सामन्यांंना मुकला. तो हैदराबाद येथे पहिली कसोटी खेळला होता. बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने राहुलच्या दुखापतीची आणि फिटनेसची पाहणी केली. त्यानंतर लंडनमधील जाणकारांकडून तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला.
पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटिदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
Web Title: indian cricket team captain Rohit Sharma has reached Dharamshala in a private helicopter for IND vs ENG 5th Test match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.