मुंबई, दि. 14 - श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने धुळ चारून भारतीय संघाने इतिहास रचला. यासोबत सलग आठ मालिकांमध्ये विजय मिळवण्याची किमया विराट कोहलीच्या संघाने केली. त्यामुळे विराट कोहलीचा संघ आता वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचला आहे.
भारतीय टीम सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे आहे. त्यांनी सलग 9 मालिका विजय मिळवले होते. त्यामुळे नोव्हेबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची संधी विराट कोहलीकडे असणार आहे. यापूर्वी भारताने 2008 आणि 2010 च्या दौ-यात अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि विरेंद्र सेहवाग या तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली 5 सलग विजय मिळवले होते.
टेस्ट क्रिकेटमध्ये सलग मालिका विजयात कोण पुढे-
-ऑस्ट्रेलिया -9 (2005/06-2008)
-भारत- 8 (2015- 2017)
-इंग्लंड -8 (1884-1892)
-ऑस्ट्रेलिया -7 (1945/46-1951/52)
-ऑस्ट्रेलिया -7 (1956/57-1961)
-वेस्टइंडीज-7 (1982/83-1985/86)
-ऑस्ट्रेलिया- 7 (2001/02-2003/04)
कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड, 33 कर्णधारांना जमलं नाही ते करून दाखवलं-
भारताने तिस-या कसोटीत श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला. या विजयासोबत भारताने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाइटवॉश दिला. यासोबत कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेच्या धरतीवर इतिहास रचला. विदेशी धरतीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विप देण्यासाठी भारताला तब्बल 85 वर्ष वाट पाहावी लागली. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 28 वर्षांच्या विराट कोहलीने आपल्या अवघ्या 29 व्या कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळताना हा पराक्रम केला.
विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेत रचला इतिहास-
विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेतील हा भारताचा 18 वा मालिका विजय आहे. यादरम्यान पहिल्यांदाच भारताने 3-0 ने व्हाइटवॉश दिला आहे. 1932 सालापासून भारताने कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात सीके नायडू यांनी भारताचं कर्णधारपद सांभाळलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 33 जणांनी भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भुषवलं आहे, पण केवळ कोहलीलाच हा पराक्रम करता आला.
विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने 2000मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 ने, तर 2004 व 2010 मध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभव केला होता.
Web Title: Indian cricket team continue test series win world record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.