जोहान्सबर्ग - भारतीय आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने पाण्याच्या समस्येशी झगडणा-या केपटाऊन शहराला पाण्याच्या बाटल्या पोहोचवण्यासाठी तसंच बोअरवेलसाठी जवळपास 8500 डॉलर्स म्हणजेच 5.6 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. टी-20 मालिकेतील तिस-या आणि अखेरच्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी 1,00,000 रँड (दक्षिण आफ्रिकेचे चलन, 5.6 लाख रुपये) ‘द गिफ्ट ऑफ द गिव्हर्स फाऊंडेशन’ला दान केले. ही आफ्रिकन खंडातील सर्वात मोठी आपत्ती निवारण संस्था आहे.
भारतीय संघ केपटाऊमध्ये पोहोचला होत तेव्हा त्यांना पाण्याचा कमीत कमी वापर केला जावा यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. भारतीय संघातील खेळाडूंना आंघोळीसाठी फक्त दोन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. फक्त दोन मिनिटांत आंघोळ उरका असा आदेशच होता. पाण्याची समस्या इतकी भयानक झाली आहे आहे तेथील झाडं, फुलांनाही देण्यासाठी पाणी नाहीये.
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौ-यात कसोटी मालिकेत 2-1 ने पराभवाला सामोरं जावं लागलं. पण भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करत 5-1 ने मालिका जिंकली. तसंच टी-20 तही 2-1 ने विजय नोंदवला. सध्या भारतीय संघ तिहेरी मालिकेसाठी श्रीलंका दौ-यावर जाणार आहे.
श्रीलंकेत ६ मार्चपासून सुरू होणा-या टी-२0 तिरंगी मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली आणि संघातील सर्वात सिनिअर खेळाडू महेंद्रसिंग धोनीसह अनेक महत्त्वपूर्ण खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत आता युथ ब्रिगेड भारताची खिंड लढवणार आहे. संघात देशांतर्गत स्पर्धेत प्रभावी कामगिरी करणाºया खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. संघात ६ बदल करण्यात आले आहे आणि त्यात शिखर धवनला उपकर्णधार नेमण्यात आले आहे.
महेंद्रसिंग धोनीने विश्रांतीसाठी आग्रह केला होता. त्याचप्रमाणे, अपेक्षेनुसार भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय हार्दिक पांड्या यांनादेखील विश्रांती देण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले, निदाहस ट्रॉफीसाठी संघाला अंतिम स्वरूप देताना खेळाडूंवरील ओझे आणि आगामी वेळापत्रक लक्षात घेण्यात आले. वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा आणि दुखापतीतून वाचवण्यासाठी त्यांना पुरेशी विश्रांती दिली जावी, असा सल्ला हाय परफॉर्मन्स संघाने दिला आहे.
निवड समितीने डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२0 मालिकेत खेळणाºया सर्व खेळाडूंना निवडले आहे. राष्ट्रीय टी-२0 आणि वनडे स्पर्धेत शानदार कामगिरी करणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचेही संघात पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्ध देशांतर्गत मालिकेनंतर आॅफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अष्टपैलू दीपक हुड्डा पुन्हा एकदा संघात असतील.