T20 World Cup 2021: आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ नव्या जर्सीसह खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाच्या नव्या जर्सीचं आज अनावरण करण्यात आलं आहे.
बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत नव्या जर्सीत दिसेल असं सांगितलं होतं. त्यानुसार आज नव्या जर्सीचं अनावरण सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू रविंद्र जडेजा, गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज केएल राहुल यांनी नवी जर्सी परिधान केल्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
टीम इंडियाच्या याआधीच्या जर्सीपेक्षा नवी जर्सी काहीशी वेगळी आहे. भारतीय संघाच्या जर्सीतला निळा रंग कायम ठेवण्यात आला असला तरी त्यावरील डिझाइन बदलण्यात आलं आहे. गडद नीळ्या रंगातील जर्सीवर फिकट निळ्या रंगाच्या हलक्या रेषांचं डिझाइन जर्सीवर देण्यात आलं आहे. याआधीच्या जर्सीमध्ये खांद्यावर तीन रंगांचा एक पट्टा देण्यात आला होता. तो नव्या जर्सीतून काढून टाकण्यात आला आहे.
असा आहे टीम इंडियाचा कार्यक्रमभारतीय संघ विश्वचषकात 'ग्रूप-बी' मध्ये खेळणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने दुबईच्या स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान विरुद्ध अबूधाबीच्या मैदानात भारतीय संघ खेळणार आहे.