भारतीय कसोटी क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) इंग्लंडचा (England) चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ असा पराभव करुन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World Test Champioship) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
भारतीय संघ जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर १४ दिवस संघ क्वारंटाइन होईल. आयपीएल स्पर्धा (Indian Premier League) संपल्यानंतर लगेच भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळविण्यात येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना आधी इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येणार होता. पण आता सामना साऊथॅम्प्टनच्या एजेस बाऊल मैदानात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कारण या स्टेडियमच्या जवळच हिल्टन हॉटेलमध्ये संघ क्वारंटाइनमध्ये असणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या दृष्टीनं जवळ असल्यामुळे याच मैदानात सामन्याचं आयोजन केलं जाऊ शकतं.
१४ दिवसांच्या क्वारंटाइनसाठी भारतीय संघाची तयारीइंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर कोविड नियमांनुसार १४ दिवसांच्या क्वारंटाइनसाठी भारतीय संघानं तयारी दाखवल्याची माहिती समोर आली आहे. यात काही नियमांत पुढे बदल देखील होण्याची शक्यता आहे. कोविडच्या तत्कालीन स्थितीवरुन त्यासंबंधीचे निर्णय घेण्यात येणार आहेत.
फायनलनंतरही भारतीय संघ मायदेशी परतणार नाहीवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा सामना १८ जूनपासून सुरु होणार आहे. त्यानंतर सामना पूर्ण ५ दिवस जरी झाला तरी २२ जून रोजी सामना संपेल. पण बीसीसीआयकडून भारतीय खेळाडूंना मायदेशात तातडीनं न परतण्याच्या सूचना केली जाण्याची शक्यता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्याची कसोटी मालिका देखील खेळायची आहे. त्यामुळे इंग्लंडमध्येच राहून तेथील परिस्थितीशी संघाला जुळवून घेता येईल यासाठी भारतीय संघ मायदेशी परतणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्ट रोजी सुरुवात होणार आहे. तर पाचव्या कसोटी सामन्याला १० सप्टेंबर रोजी सुरुवात होईल. त्यामुळे भारतीय संघ थेट सप्टेंबर महिन्यातच मायदेशी परतण्याची शक्यता आहे.