२८ मार्चला सुरू झालेली इंडियन प्रीमिअर लीग २०२३चा शेवट काल ३० मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला... चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या गुजरात टायटन्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला. आता अजिंक्य रहाणे, शुबमन गिल, मोहम्मद शमी आदी खेळाडू लंडनसाठी आज रवाना होतील. विराट कोहली, उमेश यादव, रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आदी खेळाडू आधीच लंडनमध्ये पोहोचले आहेत. मनोरंजनाची आयपीएल संपल्यानंतर आता भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांना सुरुवात होणार आहे. यंदाच्या वर्षात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल, आशिया चषक, वन डे वर्ल्ड कप आदी मोठ्या स्पर्धा भारताला खेळायच्या आहेत.
भारतीय संघाचे आगामी वेळापत्रक...
- ७ ते ११ जून या कालावधीत भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यप स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करणार आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर ही मॅच होणार आहे.
- जुलै/ऑगस्ट - भारतीय संघ दोन कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्याचा अंदाज आहे. या मालिकेत भारताची दुसरी फळी मैदानावर उतरवली जाऊ शकते.
- सप्टेंबर - आशिया चषक २०२३चा मान यंदा पाकिस्तानला मिळाला आहे. पण, भारताने तिथे जाण्यास स्पष्ट नकार दिल्याने या स्पर्धेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेल सुचवला आहे, ज्यानुसार भारताचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होतील अन् उर्वरित सामने पाकिस्तानात होतील. पण, BCCIने त्यालाही नकार दिला आहे.
- ऑक्टोबर - ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी भारताविरुद्ध आधी तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
- ऑक्टोबर/ नोव्हेंबर - भारतीय संघ प्रथमच संपूर्ण वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करत आहे.. भारताचे तिसरे जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य असणार आहे. १९८३ आणि २०११ मध्ये भारताने वन डे वर्ल्ड कप जिंकला होता.
- नोव्हेंबर/डिसेंबर - ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाच्या वर्षात तिसऱ्यांदा भारत दौऱ्यावर येणार आहे. यावेळी पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका ते भारतात खेळणार आहेत.
- डिसेंबर - भारतीय संघ वर्षाअखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे