मुंबई : जगभरात आर्थिक मंदी येणार असल्याचे म्हटले जात आहे. पण भारतीय क्रिकेटपटूंची तर चांदी झाल्याचेच पाहायला मिळते आहे. कारण आता भारताच्या क्रिकेटपटूंना डबल पैसे मिळणार असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने खेळाडूंचा आता डबल पैसे देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता मंदी कसली भारतीय खेळाडूंची चांदीच आहे, अशी प्रतिक्रीया चाहते व्यक्त करत आहेत.
भारतीय संघ गेल्या काही महिन्यांपासून दमदार कामगिरी करत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, यासाठी बीसीसीआयने संघातील खेळाडूंना देण्यात येणारे पैसे डबल केले आहेत.
भारतीय खेळाडूंना यापूर्वी 125 डॉलर एवढा विदेशामध्ये खेळताना भत्ता मिळत होता. पण बीसीसीआयने आता हा भत्ता डबल केला आहे. आता खेळाडूंना 250 प्रतिदिवस असा विदेशामध्ये खेळताना भत्ता मिळणार आहे. या भत्त्यामध्ये बिझनेस क्लासचे विमान तिकिट, राहण्याची आणि लाँड्रीचा खर्च नसेल. कारण हा सारा खर्च बीसीसीआय करते. त्यामुळे या तिन्ही खर्चांव्यतिरीक्त खेळाडूंना विदेशामध्ये असताना 250 डॉलर एवढा प्रतिदिन भत्ता मिळणार आहे. खेळाडूंबरोबर निवड समिती आणि प्रशिक्षकांच्या भत्यांमध्येही वाढ केली आहे. मुंबई मिररने याबाबतची बातमी प्रकाशित केली आहे.
भारताच्या निवड समितीला प्रतिदिवस 3500 रुपये एवढा भत्ता मिळत होता. आता हा भत्ता 7500 रुपये प्रतिदिवस असा करण्यात आला आहे. विदेशामध्ये असताना निवड समिती सदस्यांना पूर्वीपासूनच 250 डॉलर प्रतिदिवस एवढा भत्ता दिला जातो. महिला क्रिकेटपटूंनाही हे भत्ते दिले जातात. हे भत्ते सामन्याच्या शुल्का व्यतिरीक्त आहेत. कारण प्रत्येक खेळाडूला एका कसोटीसाठी 15 लाख, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख आणि ट्वेन्टी-20 सामन्यासाठी तीन लाख रुपये एवढे सामन्याचे शुल्क दिले जाते. त्याचबरोबर बीसीसीआय खेळाडूंबरोबर वार्षिक करार करते. या करारानुसार A+ या श्रेणीसाठी सात कोटी , A श्रेणीसाठी पाच कोटी. B श्रेणीसाठी तीन कोटी आणि C श्रेणीसाठी एक कोटी रुपये खेळाडूंना प्रत्येक वर्षाला दिले जातात.