- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर वेस्ट इंडीज आणि अमेरिकेच्या संयुक्त यजमानपदाखाली १ जूनपासून टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. चार महिने मंथन केल्यानंतर निवडलेला भारतीय संघ संतुलित वाटत असला, तरी प्रत्येकाच्या पसंतीला उतरलेला नाही. अनेकांसह मीदेखील १५ सदस्यांमध्ये रिंकूसिंग याला स्थान हवे होते, या मताचा आहे. पण, स्थान मिळविण्यात रिंकू दुर्दैवी ठरला. आयपीएलमध्ये रिंकूला क्षमतेनुसार कामगिरीची संधीही मिळालेली नाही.
नेमकी अडचण काय?आता नेमकी अडचण काय? दोन मुद्दे आहेत. यावर कर्णधार आणि प्रशिक्षकाला मेहनत घ्यावी लागेल. खेळाडूंनीदेखील सावध राहावे. वेगवान गोलंदाजांमध्ये बळी घेण्याच्या क्षमतेचा अभाव जाणवतोय. जसप्रीत बुमराह वगळता अन्य गोलंदाज प्रभावी वाटत नाही. सिराज भरपूर धावा देतो. ज्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा होती, तो अष्टपैलू हार्दिक पांड्या ‘आउट ऑफ फॉर्म’ आहे. अर्शदीप आयपीएलमध्ये भेदक जाणवत नाही. आवेश खान आणि खलील अहमद संघात असले तरी राखीव आहेत. अशावेळी मुख्य गोलंदाज कोण, यावर सस्पेन्स कायम आहे.
संघात आघाडीचे सात-आठ गोलंदाज आहेत. मग चिंता करण्याची गरज नसावी. तरीही आठ, नऊ, दहा आणि अकराव्या स्थानावरील फलंदाजांमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांना तोंड देण्याची क्षमता जाणवत नाही. शुक्रवारी वेस्ट इंडीज संघदेखील जाहीर झाला. या संघावर नजर टाकल्यास दिसेल की, १ ते ११ व्या स्थानावरील सर्व खेळाडूंमध्ये फलंदाजी करण्याची क्षमता जाणवते. तळाच्या स्थानावरील गोलंदाजही चांगली फलंदाजी करू शकतात. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांचेही हेच वैशिष्ट्य आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने या समस्येवर तोडगा काढावा.
दुसरा मुद्दा तज्ज्ञ अष्टपैलूंचा आहे. हार्दिक फलंदाजीसह गोलंदाजीतही अपयशी ठरला. त्याच्या फिटनेसवरही शंका उपस्थित होत आहे. दबाव झुगारू शकत नसल्याने आपल्या वाट्याची चार षटके पूर्ण करताना दिसत नाही. दुसरा अष्टपैलू रवींद्र जडेजा हा चेन्नईसाठी ख्यातीनुरूप कामगिरीत अपयशी ठरला. तिसरा अष्टपैलू अक्षर पटेल फारच प्रभावशाली आहे; पण त्याला संधी मिळेलच असे नाही. जडेजा, कुलदीप यादव हे डावखुरे फिरकी गोलंदाज खेळले की अक्षरला बाहेर बसावे लागेल. अंतिम एकादशमध्ये जडेजाला प्राधान्य असेल.
कामगिरी सुधारण्यावर भर द्या
अन्य संघांवर नजर टाकल्यास इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका बलाढ्य वाटतात. वेस्ट इंडीज संघ तर आणखीच दमदार वाटतो. पाकिस्तानने आतापर्यंत संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने अन्य संघांची बलस्थाने ध्यानात घ्यावीत. विश्वचषकाआधीच्या या काळात भारतीय संघात निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूने आयपीएलमध्ये स्वत:ची कामगिरी उंचाविण्यावर भर देण्याची गरज आहे.