- शरद कद्रेकर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
क्रिकेट हा कोट्यवधी भारतीयांचा श्वास आहे. या खेळात जो क्रिकेटपटू देशाचे नाव उज्ज्वल करतो, त्याला देवत्व लाभते. तो देशवासीयांच्या गळ्यातला ताईत बनतो. सुदैवाने प्रत्येक दशकात आपल्या देशाला क्रिकेटविश्वात चमकता तारा सापडतोच. सी. के. नायडूंपासूनची ही परंपरा आता शुभमन गिलपर्यंत येऊन पोहोचली आहे...
सी.के. नायडू, लाला अमरनाथ, विनू मंकड, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली ही भारतीय क्रिकेटमधील त्या त्या दशकात आपल्या नावाचा ठसा उमटवणारी क्रिकेटपटूंची मांदियाळी आहे. त्यात आता पंजाबच्या शुभमन गिलचे नाव जोडता येऊ शकते... नुकत्याच संपलेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने तीन शतकांसह ८९० धावा कुटल्या.
सुनील गावसकर
भारतीय क्रिकेटला प्रसिद्धीचे वलय प्राप्त करून देणाऱ्या सुनील गावसकरने ७० आणि ८० चे दशक गाजवले. वेस्ट इंडिजच्या काळ्याकभिन्न तेजतर्रार गोलंदाजांचा तोफखाना असो वा इम्रान खान, वसीम अक्रम यांच्यासारखे धूर्त पाकिस्तानी गोलंदाज, या सगळ्यांना निर्भयपणे तोंड देण्याचा आदर्श गावसकर यांनी घालून दिला.
सचिन तेंडुलकर
सुनील गावसकर यांच्या कारकिर्दीची अखेर जवळ येत असतानाच ९०च्या दशकात सचिन तेंडुलकर या ध्रुवताऱ्याचा भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उगम झाला. सचिनने क्रिकेटची सर्व समीकरणेच बदलून टाकली. धावांचा रतीब म्हणजे काय, याची शब्दश: मांडणी सचिनने केली. १०० शतकांची रास रचली.
महेंद्रसिंग धोनी
भारताला तब्बल २८ वर्षांनी विश्वचषक जिंकवून देणारा महेंद्रसिंग धोनी हा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला. दोन हजारोत्तर काळात हा गुणी खेळाडू भारतीय संघाला लाभला. आपल्या उण्यापुऱ्या १५ वर्षांच्या कारकीर्दीत धोनीने आयसीसीच्या तीन स्पर्धांमध्ये भारताला अजिंक्यपद पटकावून दिले.
शुभमन गिल
१६ आणि १९ वर्षांखालील युवा गट स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी करणारा शुभमन गिल पुढच्या पायऱ्या भरभर चढून गेला. भारतीय युवा संघ वर्ल्ड कप स्पर्धेत जेता ठरला. त्यानंतर भारत ‘अ’ संघ, नंतर भारतीय कसोटी संघात शुभमनने स्थान पटकावले. केवळ स्थानच पटकावले असेच नाही तर आपल्या चांगल्या खेळाने संघातील स्थानही पक्के केले.
विराट कोहली
दिल्लीच्या विराट कोहलीनेही आपली एक विशेष ओळख क्रिकेट जगतात निर्माण केली. आक्रमक प्रवृत्तीचा विराट मैदानात गोलंदाजावर हुकुमत गाजवतो तेव्हा त्याची बॅटिंग पाहत राहावी, असे वाटते. आज सचिनच्या १०० शतकांच्या आसपास जाऊ शकणारा एकमेव क्रिकेटपटू म्हणून विराटचे नाव घेतले जाते.
Web Title: indian cricket world one decade has one hero
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.