नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघातील कर्नाटकचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनने (Abhimanyu Mithun) अचानकपणे प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 31 वर्षीय मिथुनने 2010 मध्ये भारतीय संघासाठी कसोटीत पदार्पण केले होते. भारतीय क्रिकेट संघातील त्याची कारकीर्द कमी काळाची असली तरी, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येतो दीर्घकाळ काळ खेळला आहे. (Indian cricketer Abhimanyu Mithun retirement)
भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाकडून खेळले आहेत केवळ 9 सामने - अभिमन्यू मिथुनने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 4 सामने खेळले. यात त्याने 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 विकेट्स घेतल्या आहेत. 2011 मध्ये चेन्नई येथे वेस्टइंडीजविरुद्ध खेळला गेलेला वनडे सामना हा त्याचा टीम इंडियाची जर्सी घालून खेळलाला अखेरचा सामना होता. मिथुन प्रथम श्रेणी आणि लिस्ट A मध्ये बरेच सामने खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 103 सामने खेळले आहेत, यात त्याने 338 विकेट्स घेतल्या आहेत. तर लिस्ट A आणि T-20 सामन्यांमध्ये त्याच्या 205 विकेट्स पटकावल्या आहेत.
माझ्यासाठी देशाचे प्रतिनिधित्व करणे सर्वात मोठी कामगिरी - निवृत्ती संदर्भात बोलताना मिथुन म्हणाला, मी आपल्या देशासाठी खेळलो, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कामगिरी आहे. यातून मला जो आनंद मिळाला, तो मी कधीही विसरणार नाही. मिथुन म्हणाला, मी निवृत्तीचा निर्णय माझे भविष्य आणि कुटुंबींसाठी घेतला आहे. कर्नाटकात युवा वेगवान गोलंदाज मोठ्या प्रमाणावर आहेत. मी योग्य वेळी निवृत्ती घेतली नाही, तर त्यांना संधी गमवावी लागेल. डिस्कस थ्रोअर ते क्रिकेटर - अभिमन्यू मिथुन हा सर्वप्रथम डिस्कस थ्रोअर होता. मात्र, नंतर तो क्रिकेटकडे वळला. त्याने क्रिकेटमध्ये पहिले पाऊल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून ठेवले. काही महिन्यांनंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पणही केले. पण तो फार काळ खेळू शकला नाही. आयपीएलमध्येही मिथुनने रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी एकूण 16 सामने खेळले आहेत.