नवी दिल्ली : दुखापतींनी त्रस्त असलेला स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) झालेल्या यो-यो चाचणीत यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. यामुळे तो आता पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी, धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ मात्र यो-यो चाचणी उत्तीर्ण करण्यात यशस्वी ठरला नाही. असे असले तरी तो आगामी आयपीएलमध्ये मात्र खेळेल.
हार्दिकने तंदुरुस्ती सिद्ध केल्याने आता तो गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएलच्या आधी आपल्या केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यो-यो चाचणीद्वारे तंदुरुस्ती पडताळून पाहत आहे. हार्दिक तंदुरुस्त झाल्याची बातमी भारतीय संघासाठीदेही चांगली ठरली आहे. बीसीसीआयच्या सूत्राने माहिती दिली की,‘ज्या खेळाडूंनी दुखापतीतून पुनरागमन केले, त्यांचीच यो-यो चाचणी घेण्यात आली. हार्दिक प्रमुख खेळाडूंपैकी एक असून त्याच्या सध्याच्या तंदुरुस्तीविषयीची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे होते.’
पृथ्वी आयपीएल खेळणार
दुसरीकडे पृथ्वी शॉ यो-यो चाचणी पास करण्यात अपयशी ठरला आहे. यो-यो चाचणी पास करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला १६.५ गुण मिळविणे गरजेचे आहे. पण पृथ्वीला केवळ १५ गुणच मिळविता आले. यो-यो चाचणीत अपयश आले असले तरी पृथ्वी आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. सध्या बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंमध्ये पृथ्वीचा समावेश नाही. पण तो आपल्या तंदुरुस्तीची माहिती देण्यासाठी एनसीएमध्ये आला होता.
पृथ्वीचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी सांगितले की,‘ही चाचणी केवळ तंदुरुस्ती जाणून घेण्यासाठी होती. त्यामुळे पृथ्वीला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यापासून रोखता येणार नाही.’ पृथ्वीला दुखापतीमुळे अनेकदा भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. यामुळे त्याला आयपीएलनंतर पुन्हा तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.
Web Title: Indian Cricketer All Rounder Hardik Pandya passed the yo-yo test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.