मुंबई - मुंबईत खेळल्या गेलेल्या एका क्रिकेट स्पर्धेत आंधप्रदेशच्या फलंदाजाने जबरदस्त फटकेबाजी करत एक नवा रेकॉर्ड केला आहे. आंधप्रदेशच्या वेंकटेश राव या फलंदाजाने फक्त 82 चेंडूत 279 धावा करण्याचा विक्रम केला आहे. आपल्या या धडाकेबाज खेळीत वेंकटेश रावने चौकार आणि षटकारांचा अक्षरक्ष: पाऊस पाडला. वेंकटेश रावने 40 चौकार आणि 19 षटकार लगावले. वेंकटेशने केलेल्या तुफानी खेळीच्या मदतीने आंध्रप्रदेशने महाराष्ट्र संघाचा 292 धावांनी पराभव केला.
नॅशनल ब्लाइंड स्पर्धेअंतर्गत खेळण्यात आलेल्या या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आंधप्रदेशने 980 धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये वेंकटेशचं योगदान सर्वात जास्त होते. वेंकटेशने 82 चेंडूत 279 धावा ठोकल्या. वेंकटेशच्या तुफानी फलंदाजीचा अंदाज यावरुनच लावला जाऊ शकतो की, 279 पैकी 268 धावा फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने करण्यात आल्या. याचा अर्थ फक्त 11 धावांसाठी वेंकटेशला धाव घ्यावी लागली. वेंकटेशशिवाय त्याचा सहकारी खेळाडू कृष्णाने 41 चेंडूत 75 धावा केल्या.
यानंतर फलंदाजी करण्यासाठी उतरलेला महाराष्ट्र संघ फक्त 88 धावांत गारद झाला. महाराष्ट्र संघ पुर्ण 20 ओव्हरही खेळू शकला नाही. संपुर्ण संघ अकराव्या ओव्हरलाच तंबूत परतला होता. आंध्रप्रदेश संघाचा कर्णधार अजय रेड्डीने गोलंदाजी करत तीन विकेट्स मिळवले. या स्तरावर वेंकटेशने केली धावसंख्या एक रेकॉर्ड आहे, जो करणं आजपर्यंत एकाही फलंदाजाला शक्य झालेलं नाही. वेंकटेशने केलेला ही भीमपराक्रम मोडणं सहजासहजी शक्य होणारही नाही.
या स्पर्धेतून 17 खेळाडूंची निवड केली जाणार आहे, जे पुढील वर्षी फेब्रुवारीत टी-20 कपसाठी खेळतील. त्यानंतर दुबई आणि पाकिस्तानमध्ये होणा-या वर्ल्डकपसाठी संघाची निवड होईल. या स्पर्धेत विजेत्या संघाला 50 हजार तर उपविजेता संघाला 30 हजार रोख रक्कम पुरस्कार म्हणून दिली जाते. ही स्पर्धा विशेष खेळाडूंसाठी असली तरी यामध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सीरिज, बेस्ट कॅच, बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातो.