Ekta Bisht: टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांची धुलाई होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, प्रत्येक सामन्यात किमान एक-दोन गोलंदाज असे असतात जे दमदार गोलंदाजी करतात आणि आपल्या संघासाठी झकास कामगिरी करतात. काही वेळा तर गोलंदाज संपूर्ण सामन्यालाच कलाटणी देतो. असं काहीसं आज एका सामन्यात घडलं. भारताची दमदार फिरकीपटू एकता बिश्त हिने अप्रतिम कामगिरी करून दाखवली. एकीकडे, सध्या भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे आयोजन केले जात आहे, तर महिला वरिष्ठ टी२० चॅम्पियनशिपही खेळवली जात आहे. या स्पर्धेत एकता बिश्तने ४ षटकांत ७ गडी घेण्याचा विक्रम केला.
उत्तराखंडकडून खेळताना डावखुरी फिरकीपटू एकता हिने ७ गडी तर बाद केलेच, पण त्यात तिने जास्त धावादेखील दिल्या नाहीत. तिच्या गोलंदाजीवर तिचे पूर्ण नियंत्र होते. तिने टाकलेल्या २४ चेंडूत (४ षटके) तिने झारखंडचे ७ फलंदाज बाद केले. पण महत्त्वाचे म्हणजे तिने केवळ ८ धावाच दिल्या. तिच्या २४ चेंडूंपैकी १९ चेंडू हे चक्क निर्धाव होते. एकताने ७ विकेट्स घेतल्या, त्यात तिने एक हॅट्ट्रिकदेखील घेतली. डावाच्या १९व्या षटकात एकताने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर शुभ, देवयानी आणि प्राजक्ता यांची विकेट घेतली. या षटकांत तिने एकूण ४ विकेट घेतल्या.
एकता बिश्तच्या या अप्रतिम स्पेलच्या जोरावर उत्तराखंडने अवघ्या १०७ धावांनी सामना जिंकला. झारखंडचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत केवळ ९७ धावांत गारद झाला आणि उत्तराखंडने १० धावांनी सामन्यात विजय मिळवला. एकता बिश्तने सर्वात आधी रुमाला १५ धावांवर बाद करून मग पाटील आणि मोनिका दोघींना एकाच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर तिच्या अंतिम षटकात तिने चार विकेट घेतल्या. त्यात हॅटट्रिकचा समावेश होता. शेवटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बिश्तने निहारिका माघारी पाठवले त्यानंतर हॅटट्रिक घेत सामन्यात मोलाची भूमिका बजावली.