Yuvraj Singh Ishant Sharma: भारतीय संघ सध्या आशिया चषक स्पर्धेत खेळत आहे. भारताने या स्पर्धेत साखळी फेरीत पाकिस्तान आणि हाँगकाँग या दोघांचाही पराभव केला. आता सुपर-४ फेरीत भारताचा पुन्हा एकदा पाकिस्तानशी सामना होणार आहे. भारतीय संघ साखळी फेरीत पाकिस्तान विरूद्ध खेळताना मैदानात खूपच आश्वासक दिसला. त्यामुळे यंदाच्या या स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी सिक्सर मारून मॅच जिंकवली. पण सध्या टीम इंडियाचा दुसरा 'सिक्सर किंग' युवराज सिंग चर्चेत आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा याने सोशल मीडियावर युवराजबद्दल व्यक्त होत असताना, मी या गोष्टीचा बदला नक्कीच घेईन, असं म्हटलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की झालंय तरी काय.. ते जाणून घेऊया.
भारतीय संघात अंतर्गत गटबाजी हा चाहत्यांसाठी तसा फारसा नवीन विषय नाही. सचिन-गांगुली पासून ते विराट-रोहित पर्यंत अनेक बड्या खेळाडूंमध्ये तणाव किंवा गटबाजी असल्याच्या बातम्या आणि चर्चा नेहमीच होत असतात. BCCI वारंवार हा सर्व अफवा असल्याचे सांगत असूनही या चर्चा सुरूच राहतात. त्यामुळे सध्या युवराज सिंग आणि इशांत शर्मा यांच्यात जे सुरू आहे, तो अंतर्गत वाद आहे का? असा सवाल जर तुम्हा चाहत्यांना पडला असेल, तर तसं अजिबातच नाही. हे सारं प्रकरण अतिशय हलक्याफुलक्या आणि विनोदी ढंगाचं आहे.
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा शुक्रवारी ३४ वा वाढदिवस होता. यावेळी टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने अतिशय मजेशीर पद्धतीने अभिनंदन केले. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये तो इशांतची नक्कल करताना दिसला. व्हिडिओच्या सुरुवातीला तो इशांतच्या आवाजात म्हणाला, "यार लंबू, तेरा बर्थडे है यार, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ!"
युवराजच्या या पोस्टला इशांतने देखील उत्तर दिले. इशांतने इंस्टाग्रामवरील स्टेटसमध्ये युवराज सिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. त्यात तो बदला घेण्याबाबतही बोलला. तो म्हणाला, "धन्यवाद युवी पाजी! याचा बदला नक्कीच घेतला जाईल. (कारण) तुझ्यावर आमचं प्रेम आहे!!"
दरम्यान, युवराजच्या पोस्टवर बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी आणि आयुष्मान खुराना यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. इशांतचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जवळपास १५ वर्षांचे आहे. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने भारतासाठी एकूण १०५ कसोटी सामने खेळले आहेत. वेगवान गोलंदाज म्हणून भारतासाठी सर्वाधिक कसोटी खेळणारा इशांत हा दुसरा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३११ विकेट्स आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा तो पाचवा गोलंदाज आहे. भारताचा माजी कर्णधार कपिल देव ४३४ विकेट्ससह त्याच्यापुढे आहे. २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्याने टीम इंडियासाठी पदार्पण केले होते.
Web Title: Indian Cricketer Ishant Sharma gives warning to Yuvraj Singh that revenge will be taken know whats the matter
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.