Kedar Jadhav Politics BJP: टीम इंडिया आणि IPL चे मैदान गाजवल्यानंतर माजी क्रिकेटपटू केदार जाधवराजकारणात सक्रीय होण्यास सज्ज झाल्याची माहिती मिळत आहे. क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतर केदारने समालोचकाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर आता तो राजकारणाच्या खेळपट्टीवर बॅटिंग करताना दिसणार आहे. केदार जाधवभाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव हा भाजपा प्रवेश करणार आहे.
केदार जाधवने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते आशिष शेलारांशीही संवाद साधला होता. त्यावेळेपासूनच केदारच्या भाजपा प्रवेशाची चर्चा रंगली होती. केदार जाधव हा राजकारणात प्रवेश करणारा पहिला खेळाडू नाही. या आधी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन, माजी सलामीवीर गौतम गंभीर, पश्चिम बंगालचा क्रीडामंत्री मनोज तिवारी या खेळाडूंनीही क्रिकेटनंतर राजकारणाच्या पिचवर फलंदाजी केली आहे. त्यांच्यापाठोपाठ आता केदारही सज्ज झाला असून मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात त्याचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
टीम इंडियातून खेळलेला मराठमोळा केदार जाधव हा मूळचा पुण्याचा आहे. टीम इंडियाकडून त्याने ७३ वनडे सामन्यात १३०० हून जास्त धावा केल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने ९ टी२० सामन्यात केवळ १२२ धावा केल्या. IPL मध्ये त्याची कारकीर्द चांगली होती. २०१० पासून त्याने एकूण ९५ सामन्यात १२००हून जास्त धावा केल्या. २०२४ मध्ये त्याने RCB कडून शेवटचा हंगाम खेळला.