मुंबई - जेवढं मला क्रिकेट खेळानं, महाराष्ट्रानं आणि देशानं प्रेम, आपुलकी दिलं आहे. माझी स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे नक्कीच आगामी काळात मला महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काहीतरी करायला आवडेल. मंच दुसरा असू शकतो असे संकेत देत मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) याने राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिलेत आहेत.
नुकतेच लोकसभा निवडणूक काळात केदार जाधव याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हाही अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे ते भाजपात जाणार का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा केदार जाधव म्हणाला की, मी कुठल्या पक्षात जाणार हे सांगणे खूप लवकर होईल. परंतु नक्कीच मला काम करायला आवडेल. हे काम महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी असेल. माझा वेळ त्यासाठी द्यायलाही मी तयार आहे असं त्यांनी सांगितले. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
तसेच तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा सर्व पक्षातील नेते ओळखतात. सगळ्यांनी तुम्हाला आपुलकीने वागवलेले असते. सगळ्यांना आदर असतो. महाराष्ट्राचा खेळाडू, त्यातही सोलापूरच्या माढा तालुक्यातील जाधववाडी गावासारख्या ग्रामीण भागातून मी आहे. ग्रामीण भागातला माणूस आधी महाराष्ट्रासाठी खेळतो, त्यानंतर भारतासाठी चांगली कामगिरी करतो त्यामुळे राजकीय पक्षांना त्याचा आदर असतो, त्यामुळे जशी संधी येईल तसं मी तयार असेन असंही केदार जाधव याने स्पष्ट केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याशीही केदार जाधवची जवळीक आहे. त्यामुळे केदार जाधव कोणत्या पक्षात जाणार हे तरी त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे.
केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द
अष्टपैलू खेळाडू असलेल्या केदार जाधवनं भारताकडून ७३ एकदिवसीय सामने खेळले असून १ हजार ३८९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांत दोन शतकं आणि सहा अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. केदारने नऊ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२२ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही केदार जाधवने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने आरसीबी आणि सीएसके या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे.