दुलीप करंडक स्पर्धेत उतरण्याआधी टीम इंडियाचा स्टार बॅटर लोकेश राहुल चर्चेत आला आहे. क्रिकेटरनं इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून एक खास पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने लवकरच एक मोठी घोषणा करणार असल्याचा उल्लेख केल्याचे दिसते. आता त्याच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? ते गुलदस्त्यातच आहे. पण या पोस्टनंतर सोशल मीडियावर थेट त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली आहे.
राहुलची खरी पोस्ट राहिली बाजूला, भलत्याच स्टोरीमुळं रंगली निवृत्तीची चर्चा
लोकेश राहुलनं इन्स्टा स्टोरी शेअर केल्यानंतर काही वेळानं सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीची गोष्ट चर्चेत आली. यामागचं कारण सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक दुसरी पोस्ट आहे. लोकेश राहुलनं जी खरी पोस्ट शेअर केली आहे. अगदी त्या स्टोरीचा पुढचा भाग काय असेल या अर्थाचा दुसरी भली मोठी पोस्ट स्कीनशॉटसह व्हायरल होत आहे. यात क्रिकेटनं निवृत्तीचा निर्णय घेतल्याचा उल्लेख आढळतो. पण यात काहीच तथ्य नाही.
अर्थाचा अनर्थ, उगाच उठली नको ती अफवा
लोकेश राहुलनं इन्स्टावरून जी पोस्ट शेअर केली आहे, त्यात चाहत्यांसाठी तो काहीतरी सरप्राइज घेऊन येणार असल्याचे दिसते. दुसरीकडे अर्थाचा अनर्थ करत त्याने निवृत्ती घेतल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचे दिसते. लोकेश राहुलनं ही पोस्ट शेअर करून ती डिलीट केलीये, असाही दावा काही नेटकरी करत आहेत. पण त्यात तथ्यच वाटत नाही. कारण श्रीलंका दौऱ्यावर लोकेश राहुल टीम इंडियाचा भाग होता. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही तो खेळताना दिसणार आहे. या गोष्टी तो पुन्हा टीम इंडियातील आपले स्थान पक्क करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. तो फक्त ३२ वर्षांचा आहे. त्यामुळे एवढ्या लवकर त्याच्यावर ही वेळ येईल, असं वाटतंही नाही.
लोकेश राहुलची कामगिरी
३२ वर्षीय लोकेश राहुलनं आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत भारताकडून ५० कसोटी सामने. ७७ वनडे आणि ७२ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या खात्यात २८६३ धावा जमा आहेत. याशिवाय वनडे आणि टी२० मध्ये त्याने अनुक्रमे २८५१ आणि २२६५ धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याच्या नावे शतकांची नोंद आहे. कसोटीत ८, वनडेत ७ तर टी-२० मध्ये त्याने दोन वेळा शतकी खेळी केली आहे. आयपीएलमध्ये त्याला चांगला भाव आहे.