विजयपूरा, दि. 16 - भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू राजेश्वरी गायकवाडने कर्नाटक सरकारकडून देण्यात आलेली लाखोंची कार नाकारली आहे. महागडी कार देण्याऐवजी राहण्यासाठी घर द्या अशी मागणी तिने सरकारकडे केली आहे. जिल्हा प्रभारी आणि जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांनी स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत 26 वर्षीय खेळाडू राजेश्वरी गायकवाडला पाच लाखांची कार गिफ्ट म्हणून देत असल्याची घोषणा केली होती. भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करत फायनलपर्यंत मजल गाठल्याने बक्षिस म्हणून ही कार देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
राजेश्वरी गायकवाडला माहिती मिळाल्यानंतर नम्रपणे तिने ही कार स्विकारण्यास नकार दिला आहे. तिने सांगितलं की, 'सर तुमच्याकडून माझा सन्मान केला जात आहे त्यासाठी धन्यवाद. पण मला कारची गरज नाही, मला आपल्या कुटुंबासाठी एका घराची गरज आहे. यामुळे माझी बहिण, आई आणि भावाला मदत मिळेल. आम्हाला एका घराची प्रचंड गरज आहे'.
यानंतर राजेश्वरी गायकवाडला तुमची मागणी पुर्ण करण्याचा प्रयत्न करु असं आश्वासन देण्यात आलं आहे. सध्या राजेश्वरी गायकवाड आपल्या कुटुंबासोबत एका भाड्याच्या घरात राहत आहे. याआधी राजेश्वरीला एक ऑटो-गेअर स्कूटरची चावी सोपवण्यात आली होती, जी तिने स्विकारली होती.
जबरदस्त कामगिरीबद्दल कर्णधार मिताली राजला BMW कार गिफ्टभारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला विश्वचषकात केलेल्या दमदार कामगिरी बद्दल बीएमडब्ल्यू कार गिफ्ट म्हणून मिळाली आहे. मिताली राजला हैदराबादमध्ये ही आलिशान कार भेट देण्यात आली. ज्युनिअर क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चामुंडेश्वरनाथ यांनी मितालीला बीएमडब्ल्यू कार देऊन सन्मान केला.
चांमुडेश्वरनाथ यांनी आंध्रप्रदेशच्या रणजी संघाचं नेतृत्व केलं आहे. चामुंडेश्वरनाथ यांनी याआधीही काही खेळाडूंना कार भेट दिल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने आणि विशेषत: मिताली राजने वर्ल्ड कपमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी चामुंडेश्वरनाथ बीएमडब्ल्यू कार गिफ्ट दिली. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत हातातोंडाशी आलेला विश्वचषक विजय भारतीय संघाच्या हातून निसटला. अंतिम लढतीत भारताला केवळ 9 धावांनी पराभूत व्हावे लागल्याने विश्वविजयाचं स्वप्न भंगलं. तरी भारतीय महिला क्रिकेटला या स्पर्धेत एक विशिष्ट उंची प्राप्त करुन देण्यात मितालीला यश आले. त्यामुळेच पराभवानंतरही महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव झाला.